मुंबई: भाषा ही संवादाचे माध्यम आहे, पण प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते. आज जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात. भाषा ही संस्कृतीचे लक्षण असते, त्यामुळे प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते. जगभरातल्या स्थानिक, देशी भाषा टिकाव्यात, बहुभाषिक संस्कृती आणि विविधता टिकावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मातृभाषा दिन (International Mother Language Day) साजरा केला जातो. पाकिस्तान एकत्रित असताना त्यावेळचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांग्लादेशच्या (Bangladesh) नागरिकांनी त्यांच्या मातृभाषेसाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस युनेस्कोच्या वतीनं (UNESCO) 1999 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 2002 साली मान्यता दिली.


बांग्लादेशच्या नागरिकांचा लढा (International Mother Language Day 2024 History) 


आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा बांग्लादेशच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. 21 फेब्रुवारी 1952 रोजी बांग्लादेशातील (त्यावेळचा पूर्व पाकिस्तान) लोकांनी त्यांची मातृभाषा असलेल्या बांग्ला भाषेला मान्यता मिळावी म्हणून पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांविरोधात लढा सुरु केला. या लढ्यात चार विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय भाषा दिन साजरा केला जातो.


संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातील विविध भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी 2008 साल हे आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं होतं.. त्या माध्यमातून स्थानिक भाषांचा विकास, सांस्कृतिक विविधता, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी गोष्टींचा विकास करण्याचा प्रयत्न केला गेला.


आंतरराष्ट्रीय मातृभाषादिनाची थीम (International Mother Language Day 2024 Theme) 


दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक थीमही असते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम ही 'बहुभाषिक शिक्षण - शिक्षण आणि आंतरपिढी शिक्षणाचा आधारस्तंभ' (Multilingual education – a pillar of learning and intergenerational learning) अशी आहे.  


मातृभाषेमुळे मुलांच्या आकलनात वाढ (International Mother Language Day 2024 Significance) 


भाषेचा विकास आणि विविधता जपणे ही गोष्ट संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये समाविष्ठ आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे लहान मुलांच्या आकलनात वाढ होते, त्यांचा शैक्षणिक विकास होतो तसेच त्यांचा एकूणच व्यक्तीमत्व विकास होतो. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याला जगभरातील देशांनी प्रोत्साहन द्यावं असं संयुक्त राष्ट्राने आवाहन केलंय.


संयुक्त राष्ट्राने स्थानिक लोकांच्या विकासासाठी आणि बहुसंस्कृतीच्या विकासासाठी 2022-2032 हे दशक 'संयुक्त राष्ट्र स्वदेशी भाषा दशक' (United Nations International Decade of Indigenous Languages) साजरं करण्याचं ठरवलंय.


प्रत्येक दोन आठवड्याला जगातील एक स्थानिक भाषा लुप्त होत आहे असं संयुक्त राष्ट्राचा एक अहवाल सांगतोय. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ ती भाषाच लुप्त होत नाही तर त्यासोबत संपूर्ण संस्कृती आणि वारसा लुप्त होतोय. जगातील एकूण 6000 भाषांपैकी 43 टक्के भाषा या धोक्यात आहेत, त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात सांगण्यात आलंय. त्यापैकी काहीच, शंभरीच्या पटीतील भाषांनाच त्या-त्या ठिकाणच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये स्थान मिळतंय. शंभरपेक्षा कमी भाषा या डिजिटल दुनियेत वापरल्या जातात. त्यामुळे मातृभाषेचं संवर्धन करणं आवश्यक आहे.


ही बातमी वाचा: