मुंबई: 'हाऊडी मोदी' अर्थात कसे आहात मोदी?  हेच आहे अमेरिकेत येत्या २२ सप्टेंबर रोजी टेक्सास इथं होणाऱ्या सोहळ्याचं नाव.  'हाऊडी मोदी, सामाईक स्वप्नं, उज्ज्वल भविष्य' हे ब्रीद असलेला हा कार्यक्रम टेक्सासमधल्या ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडिअममध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या 'टेक्सास इंडिया फोरम'नुसार, ५० हजारांहून अधिक लोकांनी या सोहळ्याला येण्यासाठी नावनोंदणी केली आहे. कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही उपस्थित राहणार असल्याचं 'व्हाईट हाऊस'नं कळवलं आहे. अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर मोदींचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे.


अमेरिकेत मोदी

यापूर्वी मोदींनी २०१४ या वर्षी मेडिसन स्क्वेअरमध्ये प्रवासी भारतीयांसमोर भाषण केलं होतं. २०१६मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर उद्योगांची जागतिक पंढरी मानल्या जाणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीत अशाच प्रकारच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दोन्ही कार्यक्रमांना २० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते.

'हाऊडी मोदी' म्हणणार ट्रम्प!

भारत व अमेरिकेसारख्या दोन मोठ्या लोकशाही देशांच्या प्रमुखांनी अशा प्रकारे संयुक्त सभा घेण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. भारतीय वंशाच्या लोकांची मोठी संख्या असलेल्या अमेरिकेत ५० हजार भारतीय अमेरिकी लोकांसमोर बोलण्याची ही ट्रम्प यांचीही पहिलीच वेळ ठरेल.

मोदी हाऊडी, मत मागेन आवडी!

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या कार्यक्रमाला खास उपस्थित राहण्यामागे त्यांचा स्वार्थही आहेच. पुढील वर्षी म्हणजे २०२०मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होतायत. भारतीय अमेरिकींची मतं या निवडणुकीत महत्वाची ठरतात. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून आधीच जाहीर झाले आहेत.

भारत-अमेरिका संबंध होणार घनिष्ट

'व्हाईट हाऊस'च्या प्रसिद्धी सचिव स्टिफनी ग्रिशम यांनी म्हटलंय की, मोदी-ट्रम्प यांची ही सभा भारत व अमेरिकेच्या लोकांमध्ये दृढ संबंध बनवण्याची मोठी संधी आहे. जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाही देशांदरम्यान सामरिक भागिदारीची पुन्हा ग्वाही देण्यासाठी आणि त्यांच्यातील ऊर्जा तसंच व्यापारी संबंधांना मजबूत करण्यासाठी चर्चा करण्याकरता हे व्यासपीठ महत्वाचं ठरेल.

'ट्रम्प यांचं येणं हा भारताप्रती विशेष मैत्रीभाव'

ट्रम्प यांच्याकडून या सभेत येण्याचं कळवलं गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर ट्विटद्वारे म्हटलं की, भारतीय वंशाच्या समुदायाद्वारे आयोजित कार्यक्रमात ट्रम्प यांचं स्वागत करण्याची मी वाट पाहत आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांच्याद्वारे दाखवण्यात आलेला विशेष भाव हा भारत व अमेरिका यांच्यातील विशेष मैत्रीसंबंधांना अधोरेखित करतो आणि हेही दाखवतो की हे संबंध किती मजबूत आहेत. अमेरिकी समाज आणि अर्थव्यवस्था यांच्यातील भारतीय समुदायाचं योगदानही हा भाव स्पष्ट करतो.

अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलं की, ट्रम्प यांनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात भाग घेणं हे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. 'व्हाईट हाऊस'च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी फ्रांसमध्ये भरलेल्या जी-७ शिखर संमेलन दौऱ्यादरम्यानच ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत या कार्यक्रमाचा उल्लेख केला होता.

काश्मिरवरील ट्रम्प यांची टिपण्णी आणि कपातलं वादळ

'हाऊडी मोदी'त ट्रम्प यांच्या उपस्थितीला एक पार्श्वभूमी मध्यंतरी काश्मिर आणि व्यापारी संबंधांवरून तयार झालेल्या वादंगाचीही आहे. भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अधिक कर, अमेरिकी वस्तूंची किंमत वाढवणं तसंच भारताचा 'जनरलाईज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स' (जीएसपी) दर्जा काढून घेणं यामुळे उद्भवलेल्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत.

काश्मिरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत किंबहुना,  मोदींनीच आपल्याला त्यासाठी विचारलं आहे, असं विधान करून ट्रम्प यांनी खळबळ उडवून दिली होती. अखेर ट्रम्प यांच्या उपस्थितीतच मोदींनी स्पष्ट केलं की, अन्य कोणत्याही देशाला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

मोदी-ट्रम्प भेटी

मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान या वर्षी होणारी ही तिसरी भेट असेल. फ्रान्समधील जी-७ शिखर संमेलनाआधी दोन्ही नेते जपानमध्ये आयोजित जी-२० शिखर संमेलनातही भेटले होते. ऑक्टोबर २०१६मध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे उमेदवार असलेल्या ट्रम्प यांनी तेव्हा न्यू जर्सी इथं ५००० भारतीय अमेरिकींना ट्रम्प यांनी संबोधित केलं होतं. ट्रम्प यांनी अमेरिकी भारतीयांना असंही आश्वासन दिलं की, ते राष्ट्राध्यक्ष झाल्यास 'व्हाईट हाऊस'मध्ये ते भारताचे सर्वात चांगले मित्र असतील.


'हाऊडी मोदी'साठी हव्या तुमच्या कल्पना

दरम्यान, 'हाऊडी मोदी' कार्यक्रमातील आपल्या भाषणासाठी मोदींनी मुद्दे, कल्पना मागवल्या आहेत. एका ट्विटद्वारे त्यांनी हे आवाहन केलंय. काही निवडक मुद्यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला जाईल असंही मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलंय. 'नमो' अॅपवरही अशाचप्रकारे कल्पना सुचवण्याचं आवाहन त्यांनी केलंय.