अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींच्या रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट, 24 ठार
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2019 06:05 PM (IST)
अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात राष्ट्रपती अशरफ गनी यांची आज रॅली सुरु होती. या रॅलीदरम्यान दहशतवाद्यांनी एक मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला. या आत्मघातकी हल्ल्यात आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
काबूल : अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात राष्ट्रपती अशरफ गनी यांची आज रॅली सुरु होती. या रॅलीदरम्यान दहशतवाद्यांनी एक मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला. या आत्मघातकी हल्ल्यात आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना परवान रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये अनेक जण गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुग्णालयातील डॉक्टर अब्दुल कासिम संगिन यांनी सांगितले की, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नसरत रहिमी यांनी सांगितले की, हल्लेखोर मोटारसायकलवरुन आले होते. यावेळी त्यांनी रॅलीजवळच्या पोलीस ठाण्यात बॉम्ब लावून स्फोट घडवून आणला. दरम्यान, या हल्ल्यात राष्ट्रपती गनी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.