वॉशिग्टन : अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनला ठार केल्याचं वृत्त समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवादी विरोधी कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत म्हटलं की, "अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्रात हमजा लादेनला ठार करण्यात आलं." ही कारवाई कधी करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती मात्र ट्रम्प यांनी दिलेली नाही.


याआधीही हमजा लादेनला ठार केल्याची बातमी अमेरिकन मीडियामध्ये आली होती. मात्र त्यावेळी याबाबत कुणीही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. तर अमेरिकेने  2017 मध्ये जारी केलेल्या ब्लॅकलिस्ट केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हमजा बिल लादेनचा समावेश होता.


याआधी एनबीसी न्यूजने हमजा बिन लादेनचा खात्मा केल्याचा दावा केला होता. एनबीसीने याबाबत अधिक माहितीसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यांच्या संपर्क साधला होता. मात्र ट्रम्प यांनी हमजाला ठार केल्याच्या वृत्ताला नकारही दिला नव्हता आणि होकारही दिला नव्हता. याबाबत कोणतंही वक्तव्य देण्यास त्यांनी नकार दिला होता.


ओसामा बिन लादेनची एकूण 20 मुलं आहेत, त्यापैकी हमजा 15 वा मुलगा आहे. ओसामा बिन लादेन प्रमाणे हमजा देखील इतर देशांना दहशतवादी हल्ल्याची धमकी देत होता.