Vladimir Putin Won Russia Presidential Election: रशियाच्या (Russia) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सुमारे 88 टक्के मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. सलग पाचव्यांदा पुतिन पुन्हा रशियाची सूत्र हाती घेणार आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सनं वृत्त दिलं आहे की, रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार, व्लादिमीर पुतिन यांनी 87.97 टक्के मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. 


राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही.


शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय निवडणुका अत्यंत नियंत्रित वातावरणात पार पडल्या. रशियामध्ये युक्रेन युद्धासाठी व्लादिमीर पुतिन यांच्यावर सार्वजनिक टीका करण्याची परवानगी नाही. पुतीन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झालेला. त्यांचे इतर टीकाकार तुरुंगात आहेत. 71 वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली, ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. तिघांनीही त्याच्या 24 वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणं टाळलं.


व्लादिमीर पुतिन यांनी जोसेफ स्टालिन यांचा रेकॉर्ड मोडला 


पुतिन यांच्या हजारो विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली. रशियातील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मुक्त किंवा निष्पक्ष नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या विजयासह केजीबीचे माजी लेफ्टनंट कर्नल व्लादिमीर पुतिन यांना 6 वर्षांचा नवीन कार्यकाळ मिळाला आहे. यासह, रशियामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या बाबतीत त्यांनी जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकलं आहे. 200 वर्षांहून अधिक काळ रशियाचे सर्वात जास्त काळ राष्ट्रप्रमुख राहण्याचा विक्रम पुतिन यांच्या नावावर आहे.


रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 80 लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केलं. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्लादिमीर पुतिन यांनी पहिलं मतदान केलं. पुतीन यांच्याविरोधात शुक्रवार आणि शनिवारी अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि मतपत्रिका खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, प्राथमिक निकालावरून असे म्हणता येईल की, व्लादिमीर पुतिन हे रशियन जनतेचा विश्वास कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.