वॉशिंग्टन : यूएनमध्ये कोणत्याही देशाने जरी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी व्हेटोचा वापर केला, तरी अमेरिका त्यांना न जुमानता कारवाई करेल, अशी रोखठोक भूमिका ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे आणि व्हेटोचा वापर करणाऱ्या चीनला एकप्रकारे इशाराच दिला आहे.
पाकस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या मुद्द्यावर चीनने यूएनमध्ये वारंवार व्हेटोचा वापर करत विरोध दर्शवला होता. अजहरवर बंदी घालण्याची मागणी भारताने यूएनमध्ये केली होती. त्यावेळी चीनने व्हेटोचा वापर करुन अजहरला पाठीशी घातले होते.
अमेरिकेच्या प्रशासनात व्हेटो आणि यूएनमधील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून, यूएन सिक्युरिटी काऊन्सिलचे कायमस्वरुपी सदस्य असलेले देश व्हेटोचा वापर करुन दहशतवाद्यांवरील कारवाईत कशाप्रकारे बाधा आणतात, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी दिली.
दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अमेरिकेची कारवाई कुणाच्याही व्हेटोमुळे थांबणार नाही. आम्ही आमच्या रणनितीत कोणताही बदल करणार नाही. आपण सर्व सोबत असलो, तर ध्येय लवकर गाठता येईल. अन्यथा अमेरिका वेगळ्या प्रकारे प्रयत्न करेल, असा इशाराच अमेरिकेने दिला आहे.
चीनकडून भारताविरोधी व्हेटोचा वापर
भारताने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 15 सदस्यीय मंजुरी समितीमध्ये अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, चीनने व्हेटोचा वापर करत भारताच्या प्रस्तावाला विरोध केला आणि प्रस्ताव मंजूर होण्यास तांत्रिकदृष्ट्या खोडा घातला.
व्हेटोचा अधिकार कुणाला?
संयुक्त राष्ट्राच्या 5 सदस्यांकडे व्हेटोचा अधिकार आहे. यामध्ये चीनचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत 5 कायम सभासद राष्ट्रे आहेत. त्यामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आहेत. या सर्वांना व्हेटोचा अधिकार आहे.