US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
US Voter Registration Software Error : अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्स काढताना झालेल्या सॉफ्टवेअर बिघाडामुळे गेल्या दोन दशकांत 30 हजाराहून अधिक बिगर-नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.

मुंबई : भारताप्रमाणचे जगात सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेत आणि निवडणूक प्रणालीत एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर त्रुटी समोर आली आहे. अधिकृत दस्तऐवज आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार (Reuters), गेल्या दोन दशकांत अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि सरकारी ओळखपत्रे काढताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 30 हजारहून अधिक बिगर-नागरिकांची (Non-citizens) नावे थेट मतदार यादीत जोडली गेली आहेत.
विशेष म्हणजे, या लोकांनी अर्जात स्वतः 'बिगर-नागरिक' असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. या खुलाशाने अमेरिकेतील डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या सत्ता असलेल्या राज्यांमधील प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अमेरिकेतील विविध राज्यांच्या मतदार नोंदणी प्रणालीतील (Voter Registration System) सॉफ्टवेअरच्या कामकाजात ही मोठी तांत्रिक चूक आढळली आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना नागरिकत्वाचा रकाना भरताना सॉफ्टवेअरमधील बिघाड आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही नावे मतदार यादीत समाविष्ट झाली. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते हा कोणताही नियोजित कट नसून तांत्रिक आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या मानवी चुकांचा परिणाम आहे.
US Voter List Error States : एकाच वेळी 12 राज्यांमध्ये गोंधळ
रॉयटर्सच्या (Reuters) अहवालानुसार, या प्रशासकीय चुकीचा फटका अमेरिकेतील डझनभर राज्यांना बसला आहे. यामध्ये कॅलिफोर्निया, इलिनॉईस, आयोवा, नेव्हाडा, ओहायो, ओरेगॉन, पेनसिल्व्हेनिया, दक्षिण डकोटा, टेक्सास, युटा आणि व्हर्जिनिया यांसारख्या प्रमुख आणि महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.
New Jersey Voter List Glitch : न्यू जर्सीमध्ये सर्वात मोठा खुलासा
या मालिकेतील सर्वात ताजा प्रकार न्यू जर्सी राज्यात उघडकीस आला होता. तेथील प्रशासनाने स्वतः मान्य केले की, एका तांत्रिक सॉफ्टवेअर चुकीमुळे जून 2023 ते जून 2024 या एका वर्षाच्या काळात सुमारे 6,600 बिगर-नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली. अर्जदारांनी 'नागरिक आहात का?' या प्रश्नावर स्पष्टपणे 'नाही' (NO) असे लिहिलेले असतानाही सॉफ्टवेअरने त्यांना मतदार म्हणून नोंदवून घेतले होते.
US Election Results Impact : अमेरिका निवडणुकीच्या निकालांवर काय परिणाम होणार?
तांत्रिक चुकीमुळे 30 हजारांहून अधिक नावे चुकीच्या पद्धतीने यादीत जोडली गेली असली, तरी अमेरिकेतील 17 कोटींहून अधिक नोंदणीकृत मतदारांच्या तुलनेत हा आकडा अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे या चुकीचा अमेरिकेच्या अध्यक्षीय किंवा सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांवर कोणताही मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच यापैकी किती बिगर-नागरिकांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला, याचे निश्चित आकडे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.
Donald Trump Reaction : डोनाल्ड ट्रम्प आक्रमक; राजकारण तापले
या घटनेनंतर अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी असा आरोप केला आहे की, बिगर-नागरिकांनी मतदान करणे ही एक गंभीर समस्या असून हा विरोधी 'डेमोक्रेट्स' पक्षाचा आगामी निवडणुका जिंकण्यासाठीचा एक छुपा कट आहे. या घटनेचा हवाला देत ट्रम्प समर्थक आता मतदार नोंदणीचे नियम अत्यंत कडक करण्याची आणि नोंदणीवेळी नागरिकत्वाचा पक्का पुरावा सक्तीचा करण्याची जोरदार मागणी करत आहेत.
ही बातमी वाचा:






















