US Election : अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वप्नांना धक्का देत जो बायडन यांनी अमेरिकेच्या निकालात जोरदार मुसंडी मारली आहे. अर्थात अद्याप अंतिम निकाल हाती यायला वेळ आहे, मात्र बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांचा विजयाचा मार्ग ट्रम्प यांच्या तुलनेने सोपा मानला जात आहे.


मतमोजणी थांबली तेव्हाही बायडन आघाडीवर होते. बायडन यांनी आतापर्यंत घेतलेली मतं ही विक्रमी मतं आहेत. तसंच विजयाचा आत्मविश्वास बायडन यांच्या भाषणातून देखील दिसून येत आहेत. निकाल अजून लागायचाय पण, जर जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष झाले तर त्याचा भारतावर काय परिणाम होणार? हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे.


जो बायडन अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक
माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत.राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी आठ वर्ष काम केलं आहे.  ओबामांसोबत बायडन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत.  याशिवाय बायडन यांचे भारतीय अमेरिकन्ससोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


भारत अमेरिका सिव्हिल न्युक्लिअर डील आणि 500 बिलियन अमेरिकन डॉलरच्या द्विपक्षीय व्यापारातही बायडन यांची महत्वाची भूमिका होती. व्यापाराबाबत बायडन यांचं धोरण अमेरिका फस्ट असंच आहे. बायडन यांच्या या धोरणाचा भारताना कमी फायदा होईल. त्यांनी  अमेरिका आणि भारतातील मिडल क्लासला उभारी देण्यासाठी व्यापारावर जोर देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी ट्रम्प यांच्या एच-1 बी व्हिजा रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. हा व्हिजा रद्द केल्यानं भारतीय आयटी प्रोफेशनल्सचं खूप नुकसान झालं होतं.


बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची मोठी संख्या


बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्या वतीने, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत, तर बायडन यांचे दोन महत्त्वाचे सल्लागारदेखील भारतीय वंशाचे आहेत. याखेरीज बायडन यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले आहे की, ओबामा-बायडन प्रशासनाने नेहमीच भारताशी मजबूत संबंधांना प्राधान्य दिले. जर मी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आलो तर त्याला सर्वप्रथम प्राधान्य असेल.


अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून श्री ठाणेदार झाले आमदार


 द्विपक्षीय व्यापार कसा राहिल?
तज्ज्ञांच्या मते ट्रम्प-बायडन पैकी कुणीही सत्तेत आला, तरी दोन्ही देशांमधली द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढतच राहतील. अमेरिकेत भारतीय वंशाचे जवळपास 40 लाख लोक आहेत. त्यापैकी २० लाख मतदार आहेत.  अमेरिकेतील एरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन आणि टेक्साससह 8 जागांवर भारतीयांची मते बरीच प्रभावी ठरतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी भारकीय मतदार आपल्या बाजून करण्याचे अनेक प्रयत्न केलेत. आणि हे मतदार कोणाच्या बाजूनं गेलेत हे तर लवकरच स्पष्ट होईल.


मोदींच्या काही धोरणांना बायडन यांचा विरोध
जो बायडन यांनी मोदी सरकारच्या काही धोरणांवर आधी सवाल केले आहेत. त्यांनी  सीएए आणि एनआरसीवरुन सरकारवर टीका केली होती. काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यावरुन देखील त्यांनी सवाल केले होते. मात्र काश्मीर मुद्द्यावरुन मध्यस्थी करण्यावर पंतप्रधान मोदींनी हा अंतर्गत मुद्दा असल्याचं ट्रम्प यांना देखील सांगितलं होतं.  दुसरीकडे ट्रम्प यांच्याप्रमाणेच बायडन देखील चीनच्या विरोधात आहेत. त्यामुळं सीमावादाच्या प्रश्नावर बायडन यांची भारताला मदत होऊ शकते.


बायडन यांनी वेळोवेळी भारताचं समर्थन केलं आहे. नुकतंच ट्रम्प यांनी भारतातील अस्वच्छतेवरुन 'घाण देश' असल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावरुनही बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. तसंच बायडन म्हणाले होते की, आम्ही भारतासोबतच्या मैत्रीची कदर करतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिका भारतासोबत आहे. आम्ही भारतासोबत मिळून यावर काम करु. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सोबत आहोत, असं ते म्हणाले होते.


बायडन यांनी मोडला ओबामांचा विक्रम
सीएनएन न्यूजच्या ताज्या आकडेवारीनुसार जो बायडन यांना 50.5 टक्के मतं मिळाली आहेत तर  डोनाल्ड ट्रंप यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत. बायडन यांना आतापर्यंत 7 कोटी 15 लाख 97 हजार 485 मतं मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना 6 कोटी 80 लाख 35 हजार 427 मत मिळाली आहेत.  जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले आहेत. ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यांनी ओबामा यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये 2008 साली ओबामा यांना 69,498,516 मतं मिळाली होती. ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बायडन यांना आतापर्यंत 69,589,840 मतं मिळाली होती. अद्याप लाखो मतांची मोजणी करणं बाकी आहे.


पॉप्युलर मतांमध्ये ट्रम्प यांना टाकलं मागे


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 66,706,923 मतं मिळाली आहेत. लाखो मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पही ओबामांचा रेकॉर्ड मोडू शकतात. दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पॉप्युलर मतं मिळवणाराच उमेदवार राष्ट्रपती पदी विराजमान होतो, असं नाही. निवडणूकांमध्ये विजय मिळवण्यासाठी 270 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रोल मतं मिळवणं आवश्यक असतं. आतापर्यंत बायडन यांना 264 मतं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांच्या खात्यात 214 इलेक्ट्रोरल मतं आहेत.



संबंधित बातम्या


US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप


US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट


US Election Results LIVE | बायडन 270 च्या जादुई आकड्याजवळ पोहोचले, ट्रम्प अद्याप मागे