US Elections Result: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक टप्प्यावर आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दरम्यान मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या पेंसिल्वेनिया मध्ये मतगणना थांबवण्यात आली आहे. तिथं आता उद्या मतगणना होणार आहे. त्यामुळं अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या अंतिम निकालासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी मतगणनेबाबत घोटाळ्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, तर बायडन यांनी देखील कोर्टात जाण्याबाबत भाष्य केलं आहे.
ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला. तसंच ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत, असे ट्रम्प व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकी नागरिकांचे आभार मानले आहेत. आम्ही जिंकण्याच्या उत्सवाची तयारी करत आहोत, आम्ही सगळं जिंकणार आहोत. निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असेल, आणि अपेक्षेप्रमाणे आपण जिंकू, असं ट्रम्प यांनी म्हटलं. त्यांनी बायडन यांच्यावर मतांच्या गणनेत घोटाळ्य़ाचा आरोप केला आहे. पेंसिल्वेनिया मध्ये रात्रभर मतगणना का होत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. अमेरिकेच्या लोकांना धन्यवाद देत ट्रम्प यांनी ट्वीट केलं होतं की, आम्ही संपूर्ण देशात चांगल्या स्थितीत आहोत. अमेरिकत वोटिंग सुरु आहे. सर्वांनी मतदान करावं. माझ्यासाठी जिंकणं सोपं आहे मात्र हार पचवणं कठिण आहे, असं त्यांनी म्हटलंय. आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत दावा केला होता की, त्यांच्या सरकारच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था 33.1 टक्क्यांनी सर्वात वेगाने वाढली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल.
आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्वास - बायडन
इलेक्टोरल मतगणनेत बायडन आतापर्यंत तरी आघाडीवर आहेत. दरम्यान बायडन यांनी देशाला संबोधित करत जिंकण्याबाबतचा दावा केला आहे. बायडन म्हणाले की, आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. आपण वाट पाहू. आपण ऐरिजोना आणि मैनिसोटा सह अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. बायडन म्हणाले की, निवडणूक तोवर संपणार नाही जोवर एक एक बॅलेटची मोजणी होणार नाही. मी किंवा ट्रम्प कुणीही जिंकण्याबाबत घोषणा करु शकत नाही. ते अमेरिकन जनता ठरवेल.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर
अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागणार असला तरी हा मुकाबला आता रोमांचक होत आहे. बायडन यांना आतापर्यंत 236 आणि डोनाल्ड ट्रंप यांना आतापर्यंत 213 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.
विक्रमी मतदान
अमेरिकेत यंदा राष्टपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपलं मतदान केलं होतं. यामुळं यंदा विक्रमी मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये सोबतच निवडणूक पार पडली.