हॅम्पस्टीड: अमेरीकेच्या राष्ट्रअध्यक्षपदाची निवडणूक आता अंतिम टप्यावर पोहचली आहे. आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात युक्तीवाद झाला. जवळपास दीड तास सुरु असलेल्या या चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा, अमेरिकेची दशा आणि दिशा या मुद्द्यांसोबतच काही वैयक्तिक जीवनातील विषयावरुनही आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. या चर्चेवेळी हिलरी क्लिंटन यांनी सरकारी कामांसाठी वैयक्तिक ई-मेल आयडी वापरल्याचे प्रकरण चांगलेच गाजले.

ट्रम्प कर्जबाजारी: हिलरी क्लिंटन

यावेळी हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांना कर्जबाजारी असल्याचा आरोप केला. हिलरी क्लिंटन यांनी उद्योग आणि टॅक्स रिटर्नचा प्रश्न उपस्थित करुन ट्रम्पनी 6 वेळा आपल्या उद्योगांचे दिवाळे काढले. त्यामुळे त्यांना कर्जदारांचा राजा घोषित केलं पाहिजे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्यावर टॅक्स रिटर्नचा हिशेब दिला नसल्याचा आरोप केला.

यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सर्वांसाठी तयार करणार सांगितले. त्या म्हणाल्या की, आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वसमावेशी बनवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याची गरज आहे.

ओबामा प्रशासनानं 8 वर्षात देशावर कर्ज वाढवलं: ट्रम्प

या चर्चेत हिलरी आणि ट्रम्प यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. हिलरींच्या प्रत्येक आरोपांचे खंडन करुन ओबामा प्रशासनालाच टीकेचे लक्ष्य केले. हिलरी क्लिंटन आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आवलंबिलेल्या धोरणांनी गेल्या 8 वर्षात देशावरील कर्ज 9 ट्रिलियनवर पोहोचलं आहे.

हिलरींनी 'ते' 33 हजार ई-मेल सार्वजनिक करावेत:ट्रम्प

हिलरी क्लिंटन यांच्या टॅक्स रिटन्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना, त्यांनी हिलरी क्लिंटनच्या ई-मेल प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हिलरी यांनी या चर्चेदरम्यान वैयक्तिक ई-मेलचा वापर करणं ही आपली चूक असल्याचं मान्य केलं. यावर ट्रम्प यांनी आपण आपले आयकर रिटन्सचं विवरण सादर करण्यास तयार आहोत, त्या बदल्यात हिलरी क्लिंटन यांनी डिलिट केलेले ते 33 हजार ई-मेल सार्वजानिक करावेत अशी मागणी केली.

हिलेरी क्लिंटन यांनी 2009 ते 2013 दरम्यान अमेरिकेचं परराष्ट्र खाते सांभाळलं. या कार्यकाळात त्यांनी गुप्त माहितीच्या देवाण-घेवाण करण्यासाठी आपल्या वैयक्तिक ई-मेलचा वापर केला होता. हे प्रकरण उजेडात आल्यावर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एफबीआयने चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर ऑटर्नी जनरल लॉरेटा लिंच यांनी याप्रकरणी हिलरी क्लिंटन यांना क्लीन चीट दिली होती.

या चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडणार आहे. त्यातली आजची पहिली फेरी पाड पडली.