न्यूयॉर्क : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, त्यामुळे काश्मीर बळकावण्याचं स्वप्न पाहू नये, अशा कठोर शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे.
सुषमा स्वराज यांनी 71 व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने पाकिस्तानला दरडावलं आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या देशांना वाळीत टाकण्याचं आवाहनही स्वराज यांनी यावेळी केलं. दहशतवाद्यांना शस्त्र, पैसा कोण
पुरवतं, हे शोधून काढा असंही सुषमा स्वराज यांनी म्हटलं.
भडकवणारी भाषणं करुन काश्मीर मिळेल, असं कोणाला वाटत असल्यास जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, काश्मीर बळकावण्याचं स्वप्न पाहू नये, असं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं.
दहशतवादाला पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक :
दहशतवादाला थारा देणारे सर्वात मोठे दोषी असतात. दहशतवादाला पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक असतो, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला. ज्यांची घरं काचेची आहेत, त्यांनी इतरांना शिकवू नये, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानात काय चाललं आहे, ते पाहावं, असंही त्या म्हणाल्या.
जो जसं पेरतो, तशीच कटु फळं त्याला चाखायला मिळतात, याला इतिहास साक्षीदार असल्याचं वक्तव्यही स्वराज यांनी केलं. दहशतवाद हा जगाला लागलेला मोठा शाप आहे. आपापसातले मतभेद विसरुन दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढा देण्याची आवश्यकताही स्वराज यांनी व्यक्त केली.
दहशतवाद हे मानवाधिकाराचं सर्वात मोठं उल्लंघन:
छोट्या छोट्या संघटनांनी दहशतवादाचं भीषण स्वरुप धारण केलं आहे, अशी भीती व्यक्त करतानाच निर्दोषांचे जीव घेणारे दहशतवादी मानवाधिकाराचं सर्वात मोठं उल्लंघन करत असल्याचं स्पष्ट मतही त्यांनी मांडलं.
आम्ही दोन वर्षात पाकिस्तानशी मैत्री करण्यासाठी वारंवार हात पुढे केले, मात्र आम्हाला त्याच्या मोबदल्यात पठाणकोट आणि उरी मधील हल्ले सहन करावे लागले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी बहादुर अली हा आमच्याकडे पाकविरोधातला जिवंत पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाषणातील इतर मुद्दे :
पॅरिस करारासाठी भारत 2 ऑक्टोबरला प्रतिज्ञापत्र सादर करणार
मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात रोजगारनिर्मिती
आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व देशांचे आभार
स्वच्छ भारत, स्त्री-पुरुष लैंगिक समानता, बेटी बचाओ, जनधन योजना सुरु
आर्थिक मंदीच्या काळातही भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था
71 व्या संयुक्त महासंघाच्या अधिवेशनात सुषमा स्वराज यांचं हिंदीतून भाषण