सिंगापूर: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांची अखेर भेट झाली. सिंगापूरमधील हॉटेल कॅपेलामध्ये ही भेट झाली. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली.
आपल्या दोन्ही देशांचे संबंध चांगले असतील, अशी सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तर किम जोंग म्हणाले, "तुमची भेट होणं इतकं सहज शक्य नव्हतं. मात्र सर्व अडथळे पार करुन ही भेट झाल्याने मला खूपच आनंद झाला आहे".
सकाळी पावणे सातला सिंगापूरमध्ये या दोघांनी भेट घेतली. सिंगापूरमधल्या दि कॅम्पेला हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी ऐतिहासिक भेटीपूर्वी पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्या.
त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला खूपच आनंद होत आहे. आमच्यात सकस चर्चा होणार आहे. आमची भेट यशस्वी होईल यात शंक नाही. ही भेट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. आमच्या भेटीमुळे दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील, यात मला शंका वाटत नाही"
ही भेट यशस्वी ठरल्यास एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या दोन देशांमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होऊ शकते. त्याचबरोबर जगात शांतता नांदण्यासाठी ही भेट अत्यंत महत्वाची असल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.
दोन्ही देशांमध्ये जवळपास 70 वर्षांपासून कोणतेही संबंध नव्हते. इतर वेळी पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या सिंगापूरकडे सध्या सगळ्या राजकीय पंडितांचे डोळे लागले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीला अमेरिकाचा असलेला विरोध, आणि त्या पार्श्वभूमीवर या 2 नेत्यांची भेट महत्वपूर्ण असणार आहे.
किम-ट्रम्प भेटीवर सिंगापूरचा 100 कोटींचा खर्च
सिंगापूर सरकारने ट्रम्प-किम जोंग उन यांच्या भेटीवर 100 कोटी एवढा खर्च करत आहे. कारण, जागतिक शांततेसाठी हे आमचं योगदान असल्याचं सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांनी सांगितलं. उत्तर कोरियाने या बैठकीसाठी हॉटेलचं बिल भरण्यासाठी हात वर केले होते, तर अमेरिकेनेही उत्तर कोरियाचा खर्च करण्यासाठी नकार दिला होता. अखेर सिंगापूर सरकारने या खर्चाची जबाबदारी उचलली.
संबंधित बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी किम जोंग सिंगापुरात दाखल
किम-ट्रम्प भेटीवर सिंगापूरचा 100 कोटींचा खर्च