सिंगापूर : कॅपेला हॉटेलमध्ये 12 जून म्हणजे उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांची भेट होणार आहे. सुरक्षा एवढी चोख करण्यात आलेली आहे, की सुरक्षारक्षकांनी पत्रकारांनाही तयारीचा आढावा घेण्यास मनाई केली. या बैठकीवर 20 मिलियन सिंगापूर डॉलर म्हणजे जवळपास 100 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांनी सांगितलं.
जगाच्या शांततेसाठी सिंगापूर 100 कोटी खर्च करणार
सिंगापूर सरकार या भेटीवर एवढा खर्च करत आहे, कारण, जागतिक शांततेसाठी हे आमचं योगदान असल्याचं ली सेन लुंग यांनी सांगितलं. उत्तर कोरियाने या बैठकीसाठी हॉटेलचं बिल भरण्यासाठी हात वर केले होते, तर अमेरिकेनेही उत्तर कोरियाचा खर्च करण्यासाठी नकार दिला होता. अखेर सिंगापूर सरकारने या खर्चाची जबाबदारी उचलली.
अमेरिकन अधिकाऱ्यांकडून 674450 रुपयांपर्यंतचे रुम बूक
'एफे' या वृत्तसंस्थेच्या मते, सिंगापूरच्या सेंटोसा बेटावरील या पंचतारांकित हॉटेलात फक्त संबंधित कर्मचारी आणि आमंत्रित पाहुणेच प्रवेश करु शकतात. कारण, व्हाईट हाऊसकडून मंगळवारी होणाऱ्या भेटीच्या घोषणेच्या अगोदरच रुम बूक करण्यात आल्या आहेत.
या रुममध्ये एका व्यक्तीचा खर्च 10 हजार डॉलर म्हणजे जवळपास 6,74,450 रुपये आहे. कॅपेला हॉटेलचे व्यवस्थापक फर्नाडो गिबाजा यांना भेटीच्या तयारीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र या भेटीबाबत हॉटेल कोणतीही माहिती देऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कारण, पाहुण्यांची प्रायव्हसी हीच हॉटेलची प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले.
ऐतिहासिक भेटीसाठी उधारीवर आणलेलं विमान
भारतीय वेळेनुसार सव्वा बारा वाजता सिंगापूरच्या चांगी विमानतळावर जेव्हा एअर चायनाचं 747-4J6 हे विमान लँड झालं, तेव्हा एका नव्या इतिहासाची नोंद झाली. चीनकडून उधारीवर आणलेल्या या विमानाने किम जोंग उन डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी दाखल झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियाच्या एखाद्या प्रमुखाची भेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय किम जोंग उनचीही परदेशी धरतीवर कॅमेऱ्यासमोर येण्याची ही पहिली वेळ आहे.
शांततेसाठी चीन आणि सिंगापूरचं सहकार्य
सिंगापूरने या भेटीवर 100 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली, तर चीननेही उत्तर कोरियाहून येणाऱ्या शिष्टमंडळासाठी विमान पुरवलं. एअर चायनाच्या विमानानेच किम जोंग उनचं शिष्टमंडळ सिंगापुरात दाखल झालं. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालाकृष्णन यांनी विमानतळावर किम जोंगचं स्वागत केलं.