International Biodiversity Day 2021 : सजिवांना पृथ्वीवर जगायचं असेल तर जैवविविधता टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. सध्या भूतलावरील जैवविविधतेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होताना दिसत आहे. त्याला अनेक मनुष्यनिर्मित गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे या विषयावर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी एक भूमिका घेतली पाहिजे, कृती केली पाहिजे आणि जैवविविधतेसोबत एक प्रकारचा संबंध निर्माण केला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे. 


 






आंतरराष्ट्रीय जैवविविधता टिववून ठेवण्यासाठी सीबीडी अर्थात कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हरसिटी या माध्यमातून काम केलं जातं. सीबीडीचा करार हा 1993 साली अंमलात आणण्यात आला. 1992 सालच्या वसुंधरा परिषदेतून हा करार तयार झाला होता. सुरुवातीला सीबीडी हा करार ज्या दिवशी पास करण्यात आला त्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबरला जैवविविधता दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. पण 2001 साली संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं हा दिवस 22 मे रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


 






हा दिवस साजरा करताना दरवर्षी एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीसाठीची थीम आहे,  “We’re part of the solution”. गेल्या वर्षीच्या मोहिमेला पुढे सुरु ठेवण्यासाठीच ही थीम तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षीची थीम होती  “Our solutions are in nature”. जैवविविधता ही शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे आणि येत्या काळातील शाश्वत विकासासमोर जी काही आव्हानं उभी राहतील त्यावर मात करण्यासाठी जैवविविधतेचे संर्वंधन करणं अत्यावश्यक आहे. या वर्षी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहेत. 


जगभरात निसर्गात सध्या जवळपास 8.7 मिलियन दशलक्ष प्रजाती आढळतात असं एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे. त्यामधील 80 टक्के प्रजातींवर अद्यापही अभ्यास झाला नसल्याचं स्पष्ट आहे. अलिकडे वातावरण बदलाचा परिणाम या प्रजातींवर होत असून अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत तर अनेक त्या मार्गावर आहेत. 


महत्वाच्या बातम्या :