Ukraine Russia War : रशियन रॉकेट हल्ल्याने युक्रेनमधील तिसरे सर्वात मोठे शहर ओडेसा आणि ब्लॅक सी पोर्टमधील विमानतळाच्या धावपट्टीचे (Runway) नुकसान झाले. युक्रेनच्या लष्कराने ही माहिती दिली. सोसल मीडीयावरील एका पोस्टमध्ये युक्रेनच्या 'ऑपरेशनल कमांड साउथ'ने सांगितले की, रॉकेट हल्ल्यानंतर ओडेसा रनवे निरुपयोगी झाले आहे.


हे रॉकेट रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधून डागण्यात आल्याची माहिती


युक्रेनची वृत्तवाहिनी UNIAN ने लष्कराच्या सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की, स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले आहे. ओडेसामध्ये अनेक स्फोट ऐकण्यात आले आहेत. दरम्यान ओडेसाच्या गव्हर्नरने सांगितले की, हे रॉकेट रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधून डागण्यात आले. त्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


मॉस्कोने युक्रेनमधून दहा लाख लोकांना बाहेर काढले - रशियाचे परराष्ट्र मंत्री


रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून मॉस्कोने युक्रेनमधून दहा लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत लावरोव्ह यांनी ही माहिती दिली. लॅव्हरोव्ह यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा युक्रेनने मॉस्कोवर लोकांना जबरदस्तीने देशाबाहेर पाठवल्याचा आरोप केला आहे.


300 हून अधिक चिनी नागरिकांचा समावेश


लॅव्हरोव्ह म्हणाले की, या आकडेवारीत 300 हून अधिक चिनी नागरिकांचा समावेश आहे. ते म्हणाले की रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळजवळ दररोज चर्चा सुरू आहे. तसेच त्यांनी सावध केले की "या संदर्भात प्रगती करणे सोपे नाही." लॅव्हरोव्ह यांनी चर्चेत "कीव्ह राजवटीच्या पाश्चात्य समर्थकांकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक वक्तृत्व आणि प्रक्षोभक कृती" ला दोष दिला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: