Ukraine Russia War : गेल्या 22 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करत आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील 103 मुलांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक मुले जखमी झाली आहेत. या हल्ल्यामध्ये शेकडो निष्पाप नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. तर युक्रेनने रशियाच्या 14 हजार सैनिकांना मारले असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच रशियाची 86 विमाने, 108 हेलिकॉप्टर आणि 444 रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत.  युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून रशियाचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे याबाबतची माहिती दिली आहे.   


युक्रेनने दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत रसियाची 43 विमानविरोधी युद्ध प्रणाली, तीन जहाजे, 864 वाहने, 201 तोफखान्याचे तुकडे, 1455 चिलखती वाहने आणि 10 विशेष उपकरणे नष्ट केली आहेत. दुसरीकडे रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये स्फोट आणि गोळीबार सुरूच आहे. बुधवारी चेर्निहाइव्हमध्ये रशियन हवाई हल्ल्यात आणि गोळीबारात 53 नागरिक ठार झाले आहेत. चेर्निहिव्ह ओब्लास्टचे राज्यपाल व्याचेस्लाव चाऊस यांनी ही माहिती दिली आहे. रशियन सैन्याने बुधवारी मारियुपोलमधील एक थिएटर नष्ट केले आहे. या थिएटरमध्ये शेकडो लोकांनी आश्रय घेतला होता. 






युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, रशियाच्या हवाई हल्ल्याने एका भव्य इमारतीचे केंद्र नष्ट केले आहे. या इमारतीत शेकडो नागरिक राहत होते. या हल्ल्यानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हचे महापौर विटाली क्लिटस्को यांनी सांगितले की, रशियन गोळीबारामुळे शहराच्या शेजारच्या पोडिलमधील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यभागी उत्तरेस आहे.   


दरम्यान, युक्रेनमधीर अधिकाऱ्यांनी अद्याप या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल माहिती दिली नाही. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे कीव्हमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, युक्रेनच्या मेलिटोपोल शहराच्या महापौरांची रशियन सैन्याने पाच दिवस ओलीस ठेवल्यानंतर त्यांची सुटका केली आहे.


महत्वाच्या बातम्या