सेऊल : चीननंतर आता दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गुरुवारी एकाच दिवसात त्या देशात कोरोनाच्या 6.21 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच मृतांच्याही आकड्यात वाढ होत असून गुरुवारी ती 429 इतकी झाली आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.  कोरियामध्ये वाढलेल्या या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.


दक्षिण कोरियात गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी कोरियात 3.62 लाख रुग्ण, बुधवारी 4 लाख तर गुरुवारी तब्बल 6.21 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या दरम्यान मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. दक्षिण कोरियातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 82 लाख 50 हजार 592 इतकी झाली आहे. 


दक्षिण कोरियात पसरणाऱ्या या रुग्णसंख्येला स्थानिक पातळीवरील झालेला प्रादुर्भाव कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, दक्षिण कोरियातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना कोरोनाच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सहापेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कंपन्यांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. 


मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये 293 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. चीननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात कोरोनाची चौथी लाट येणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणाने उदयास आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (WHO) सांगितलं आहे की, 2021 च्या तुलनेत यावर्षी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची आतापर्यंत नोंदवलेली प्रकरणे सर्वाधिक आहेत. तसेच ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणामुळे आणखी एक नवीन व्हेरियंट निर्माण होऊ शकतो.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha