UK Prime Minister Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेर हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधानपदासाठी नवीन नावाची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत.पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षात (Conservative Party)  बंड सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे सरकारवर संकट अधिकच गडद झाले होते. ब्रिटनच्या नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. 


ब्रिटनमध्ये राजीनाम्याची लाट 


भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जॉन ग्लेन, प्रीति पटेल,  ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती. 


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजी नसल्याचे म्हटले जात होते. बोरिस जॉन्सन यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठका घेतल्या होत्या. ऋषी सोनक यांच्याऐवजी नदीम जहावी यांना अर्थ खात्याची धुरा सोपवण्यात आली होती. तर, स्टीव्ह बार्कले यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र, मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या अविश्वासामुळे जॉन्सन यांनी हुजूर पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, तूर्तास सध्या तरी जॉन्सन पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.


ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. कोरोना काळात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या घरी नियमांचे उल्लंघन करून झालेल्या पार्टीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत होती.