UK PM Race: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक 88 मतांसह आघाडीवर आहेत. सध्या सुनक यांच्याशिवाय आणखी पाच दावेदार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. ब्रिटनचे नवे पंतप्रधान सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील.


ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सुनक यांच्या व्यतिरिक्त या यादीमध्ये परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस, अर्थमंत्री पेनी मॉर्डेंट, माजी कॅबिनेट मंत्री केमी बॅडनोक, खासदार टॉम तुगेंदत आणि ब्रिटिश कॅबिनेट अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांचा समावेश आहे. पेनी यांना 67, लिझ 50, कॅमी 40, टॉम तुगेंदत 37 आणि सुएला ब्रेव्हरमन यांना 32 मते मिळाली.


पहिल्या फेरीच्या मतदानात उर्वरित आठ उमेदवारांमध्ये लढत होती. नवे अर्थमंत्री नदीम जाहवी यांना 25 तर जेरेमी हंट यांना केवळ 18 मते मिळाली. यामुळे दोघेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी किमान 30 खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. अशातच पहिल्या फेरीत 88 मते मिळून ऋषी सुनक हे आघाडीवर असून ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत.


कोण आहेत ऋषि सुनक?


ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातीन एमएचं शिक्षण घेतलं. ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. 2015 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं आहे. तसेच ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुकही झाले होते. अनेक प्रसंगी, ऋषी यांनी बोरिसऐवजी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला.


दरम्यान, मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दबावाखाली आलेल्या बोरिस जॉन्सन यांनी अलीकडेच पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यानंतर 42 वर्षीय सुनक यांनी प्रचाराला सुरुवात केली. ते म्हणाले होते की, "मी एक सकारात्मक मोहीम चालवत आहे. ज्यामध्ये माझ्या नेतृत्वामुळे पक्षाला आणि देशाला काय फायदा होऊ शकतो, यावर मी लक्ष केंद्रित केले आहे."