Sri Lanka Crisis: श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिघडली आहे. आंदोलकांनी आज पंतप्रधान कार्यालयावर कब्जा केला आहे. यावेळी सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान सुमारे 30 आंदोलक जखमी झाले आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रमसिंघे म्हणाले आहेत की, आता जे निदर्शन करत आहेत, ही फॅसिस्ट शक्ती आहे. या शक्ती सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत.


विक्रमसिंघे म्हणाले की, आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना पूर्ण सूट देण्यात आली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणांनी जे काही शक्य आहे ते करावे, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे. 






राष्ट्रपती राजपक्षे आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शनिवारी राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान, टेम्पल ट्रीज या राजधानीतील तीन मुख्य इमारतींवर आंदोलकांचा अजूनही कब्जा आहे. श्रीलंका 2.2 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. आर्थिक संकटामुळे लाखो लोक अन्न, औषध, इंधन आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संघर्ष करत आहेत.


निदर्शकांनी इमारतीवर हल्ला केल्याने बुधवारी देशाच्या सरकारी दूरदर्शन वाहिनी रुपविहिनीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. श्रीलंका रुपवाहिनी कॉर्पोरेशन (SLRC) ने सांगितले की, त्यांच्या अभियंत्यांनी चॅनेलचे थेट आणि रेकॉर्ड केलेले प्रसारण बंद केले आहे. कारण निदर्शक मोठ्या संख्येने त्यांच्या इमारती खाली जमले होते. मात्र नंतर या वाहिनीने पुन्हा प्रसारण सुरू केले.


इतर महत्वाच्या बातम्या