नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जगावर ओढावलेलं संकट आता आणखी बळावताना दिसत आहे. पहिल्या (Coronavisus) कोरोना विषाणूच्या आघातातून जग सावरत नाही तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत (Britain) ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. ज्यानंतर आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं (New Strain) ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याचं वृत्त आहे.


व्हायरसचा हा प्रकार दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्यक्तींमार्फत ब्रिटनमध्ये पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. या व्हायरसचा नवा प्रकार अधिक वेगानं संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.


ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला दोन नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूची दहशत पाहायला मिळत आहे. ज्या पार्श्वभूमीवर 10 डाऊनिंग स्ट्रीटला संबोधित करतेवेळी हँकॉक म्हणाले, कोरोनाचे हे दोन्ही नवे प्रकार अशा व्यक्तींमध्ये आढळून आले आहेत, जे मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेहून परतले आहेत. कोरोनाचं हे नवं रुप चिंता वाढवणारं असून, त्यामुळं संसर्ग झपाट्यानं वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.


दरम्यान, ब्रिटनवर असणाऱ्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय सध्याच्या घडीला जे दक्षिण आफ्रिकेमघ्ये आहेत किंवा दक्षिण आफ्रिकेतील कोणाच्याही संपर्कात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत आले आहेत त्यांनी विलगीकरणाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.


Corona Vaccine | लहान मुलांना कोरोना लस देण्याची गरज नाही: नीती आयोग


भारतासह इतर देश सतर्क


तिथं ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारानं भीतीचं वातावररण असतानाच सावधगिरीचं पाऊल म्हणून भारत आणि युरोपातील अनेक राष्ट्रांनी ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. तर ब्रिटनमध्येही लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. शिवाय तिथं कोरोनाच्या असिम्प्टमॅटीक म्हणजेच लक्षणं नसणाऱ्या रुग्णांसाठी सेल्फ टेस्टचा पर्याय अवलंबात आणण्यास सुरुवात केली आहे.


ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या स्तरावर कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. लक्षणं नसणाऱ्यांची चाचण्या करण्याचं सत्र इथं सुरु करण्यात आलं आहे, जेणेकरुन कोरोनातवर शक्य तितक्या वेगानं नियंत्रण मिळवता येऊ शकतं.


संपूर्ण जगात कोरोनामुळं संकट आलेलं असताना लसीकरणाच्या बबातीतही काही राष्ट्रांमध्ये वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. इथं भारतातही लसीकरणासाठी शासनानं हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळं शक्य त्या सर्व परिंनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे, असंच म्हणावं लागेल.