लंडन : जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असल्याचं बऱ्याच देशांमध्ये यावरील लस लवकरात लवकर निर्माण करण्याचं काम सुरु आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. कोरोनाव्हायरसच्या खात्म्यासाठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्सफर्डने बनवलेली कोरोनाव्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. परंतु यानंतर त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. मात्र, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटला दिलासा मिळाला आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्परिणाम दिसू लागले. गंभीर दुष्परिणाम म्हणजे लस किंवा औषध दिल्यानंतर त्याला रुग्णालयात जावं लागलं. भारतातील चाचण्यास सुरुच राहणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे.
'रुग्ण लवकरच बरा होण्याची आशा'
त्याच्या शरीरावर नेमका काय दुष्परिणाम झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा रुग्ण लवकरच बरा होईल, अशा विश्वास या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने व्यक्त केला. खरंतर लसी बनवण्याची प्रक्रिया सुरु असताना चाचणी थांबवणं किंवा रोखणं ही बाब नवी नाही. परंतु भारतासह जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असताना लवकरात लवकर त्याच्यावरील लस तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. ही लस बनवण्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनिका आघाडीवर होते.
"2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात ही लस बाजारात येईल," असं ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक मागील आठवड्यात म्हणाले होते. भारतासह जगभरात या लसीसाठी मोठमोठ्या ऑर्डर येण्यास सुरुवात झाली होती. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 8,94,000 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत.
रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध सुरु
एस्ट्राजेनिकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल जेणेकरुन चाचणीची विश्वासार्हता कायम राहिल. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते. पण याचा स्वतंत्ररित्या सतर्कतेने तपास होणं गरजेचं आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत, जेणेकरुन चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये." ऑक्सफर्डच्या लसीत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी विकसित होत असल्याचं समोर आलं होतं.
ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना ChAdOx1 nCoV-19 लसीच्या यशाबाबत खात्री आहे. शिवाय त्यांना 80 टक्के विश्वास आहे की ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या लसीचं उत्पादन AstraZeneca ही कंपनी करणार आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसपासून बनली आहे, जो सामान्य सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूचा कमकुवत स्वरुप आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरुन मानवी शरीराला त्याचा संसर्ग होणार नाही.