लडाख : सीमेवर तणाव सुरु असतानाच पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये गोळीबाराची घटना घडली. या प्रकरण संपूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु सरकारशी संबंधित वरिष्ठ सूत्रांच्या मते परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.


एलएसीवर भारत आणि चीन दरम्यान मागील काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे 1975 नंतर सीमेवर भारत आणि चीन सैनिकामंध्ये प्रथमच गोळीबाराची घटना घडली आहे.





सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून भारतीय क्षेत्रात फायरिंग करण्यात आली. त्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.


दुसरीकडे चीनच्या संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते कर्नल झांग शुइली यांच्या वक्तव्यानुसार भारतीय सैनिकांकडून सुरुवातीला गोळीबार झाला, त्यानंतर चिनी सैनिकांनी कारवाई केली.


तर भारतीय सैनिकांनी सोमवारी पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण किनाऱ्यावर घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वॉर्निंग शॉट फायर केले, असा दावा चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने केला आहे.





दरम्यान भारताकडून या गोळीबाराबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.