Turkiye Earthquake Update : तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. तुर्की, सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.


1. या शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपाने तुर्की आणि सीरिया हादरलं आहे. सोमवारी सकाळी झालेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात दोन्ही देशांमध्ये 2600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टीमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.


2. तुर्की येथे 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंप झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, पहिला 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप सोमवारी पहाटे 4:17 वाजता तुर्कीमधील गॅझियानटेप शहराजवळ झाला. याचा केंद्रबिंदू सुमारे 17.9 किलोमीटर खोल होता. भूकंपाचा दुसरा धक्का तुर्कीची राजधानी अंकारा आणि इराकी कुर्दिस्तान शहर एर्बिलपर्यंत जाणवला. मोठ्या भूकंपानंतर तुर्की येथे 40 हून अधिक भूकंपाचे बसले. 


3. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगान यांनी 7.8 तीव्रतेच्या भूकंपाचे वर्णन 1939 नंतर देशातील सर्वात मोठी आपत्ती म्हणून केलं आहे. त्यांनी सांगितले की, 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर, 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गझियानटेप, सानलिउर्फा, दियारबाकीर, अदाना, अदियामान, मालत्या, उस्मानिया, हताय आणि किलिस प्रांत भूकंपामुळे खूप प्रभावित झाले.


4. एर्दोगान यांनी सांगितले की, 'ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांची संख्या 2,470 वर पोहोचली आहे. सुमारे 2,818 इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.' उपराष्ट्रपती फुआत ओक्ते म्हणाले की, एर्दोगान भूकंपाच्या क्षणापासून  मदत कार्याचा आढावा घेत आहेत.


5. डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने सांगितले की, तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के ग्रीनलँडपर्यंत जाणवले आहेत. तसेच डेन्मार्क आणि ग्रीनलँडमध्ये भूकंप आणि अनेक आफ्टरशॉक जाणवले आहेत.


6. भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तुर्की दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या सांत्वन करणारे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तय्यब एर्दोगान यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत तुर्कीच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.


7. दुसर्‍या ट्विटमध्ये, पंतप्रधान मोदी म्हणाले की, विनाशकारी भूकंपाचा सीरियावरही परिणाम झाला आहे. हे जाणून खूप दुःख झालं आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. आम्ही सीरियातील जनतेच्या या कठीण काळात मदत आणि समर्थन देण्यास वचनबद्ध आहोत.


8. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनंतर, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांनी तात्काळ मदत आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत सरकारने तुर्की सरकारच्या समन्वयाने एनडीआरएफ आणि मदत सामग्रीसह वैद्यकीय पथके त्वरित तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


9. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथके, विशेष प्रशिक्षित श्वान पथक आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात पाठवण्यासाठी तयार करण्यात आली. एनडीआरएफच्या दोन्ही पथकामध्ये प्रत्येकी 100 जवान आहेत.


10. यासोबतच प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिकची टीम देखील आवश्यक औषधांसह पाठवली जाईल. तुर्की सरकार, अंकारा येथील भारतीय दूतावास आणि इस्तानबूलमधील भारतीय वाणिज्य दूतावास यांच्या समन्वयाने मदत पाठविली जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Turkey Earthquake: तुर्कस्तान की भूकंपस्थान... गेल्या 24 तासात तुर्कीला भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 1700 हून अधिक मृत्यू