Turkey Earthquake News : सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपात तुर्की अन् सीरिया उद्धवस्त झाले आहेत. 16 तासात भूकंपाच्या 46 धक्क्यांनी तुर्की आणि सीरिया दोन्ही देश हादरलेत. तुर्कीत अजूनही भूकंपाचे धक्के सुरुच आहेत. तुर्की आणि सीरियात भूकंपाच्या धक्क्यांमुळे आत्तापर्यंत 2300 लोकांचा मृत्यू झालाय. एकट्या तुर्कीत बळींची संख्या 1500 वर गेली आहे. तर सीरियात 810 जणांना मृत्यू झालाय. सात हजारांहून अधिक जण जखमी आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटेपासून तुर्कीत भूकंपाचे धक्के बसू लागलेत... दक्षिण तुर्कीत 7.9 रिश्टर स्केलचा सर्वात मोठा भूकंप झाला. या धक्क्यानं तुर्की आणि सीरियातील घरं, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत... बचावकार्य सुरु आहे. त्यानंतर 44 भूकंपाचे धक्के बसल्यानं इमारती जमीनदोस्त झाल्यात. लोक जीव मुठीत घेऊन पळतायत. आक्रोश आणि किंकाळ्यांनी तुर्की हादरलंय.
रस्त्याशेजारील इमारती, घरंही कोसळली. तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळत होता. तुर्कीत भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. 250 हून अधिक इमारती कोसळल्यात. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत. तुर्की अन् सीरियातील भूकंपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुर्कीमधील भूकंपाची दृश्य पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही...
सध्या तिथं बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तुर्कीत भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये अंधार दाटून आला...
ही दृश्य सीरियातली आहे. सीरियातील दमास्कमधील सय्यदा झैनाबचे तीर्थस्थान भूकंपानं हादरलं.
एखाद्या युद्धात शहरं बेचिराख होतात अशी दृश्य समोर आली आहेत. शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. चकचकीत आणि सुंदर शहरं अक्षरशः नेस्तनाबूत झाली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लहान मुलांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत..
काही इमारती अर्धवट कोसळल्या... आणि त्यात जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या चिमुरड्याचा आवाज ऐकून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं.
सकाळी या भूंकपानं केलेल्या नुकसानीची भयावह दृश्य समोर आली. आक्रोश... किंकाळ्या आणि जीव वाचवण्यासाठी दिलेल्या हाक .. इतकंच ऐकू येत होतं. अंकारा, गझियानटेप, कहरा नमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी शहरासह 10 शहरे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. आणि ही आणखी एक इमारत कोसळतानाची दृश्य समोर आली.