मुंबई: सूर्याच्या पृष्ठभागावर घडलेल्या एका मोठ्या घडामोडीमुळे शास्त्रज्ञांना गोंधळात टाकलं आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचा एक मोठा भाग तुटला असून (Huge Piece Of Sun Breaks Off) त्याच्या उत्तर ध्रुवाभोवती चक्राकार वावटळ निर्माण झालं असल्याचं दिसून येतंय. शास्त्रज्ञांना हे चित्र दिसल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. सूर्याचा हा मोठा भाग तुटल्याचा परिणाम पृथ्वीवर कसा होईल याचा अंदाज आता शास्त्रज्ञ लावत आहेत.
अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या तमिथा स्कोव्ह यांनी या संबंधित काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये सौर प्लाझ्माचा एक मोठा फिलामेंट सूर्याच्या पृष्ठभागापासून बाजूला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळ वावटळ उटल्याचं दिसत आहे. Space.com च्या मते, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या अपवादात्मक क्षमतेमुळे अशा प्रकारचा भोवरा पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. शास्त्रज्ञांनी याआधी सूर्यापासून काही भाग फुटताना पाहिले असले तरी, ध्रुवीय वावटळी निर्माण होताना त्यांनी प्रथमच पाहिले आहे.
प्रत्येक सौर चक्रात दर 11 वर्षांनी एकदा काहीतरी विचित्र घडते असं काही शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, प्रामिनन्स हे सूर्याच्या पृष्ठभागापासून बाहेरच्या दिशेने पसरलेले एक मोठे तेजस्वी फिचर आहे. भूतकाळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु आता जी गोष्ट घडली आहे त्यामुळे शास्त्रज्ञांना धक्का बसला आहे. कारण सूर्याचा भाग वेगळा झाल्यानंतर मोठं वावटळ निर्माण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
सूर्याच्या उत्तर गोलार्धात 55 अक्षांशांवर एक मोठी सौरज्वाळा उसळली. त्या ज्वाळेमधील पदार्थ सूर्याच्या उत्तर ध्रुवाभोवती फिरू लागले. सूर्याच्या ध्रुवाभोवती फिरणाऱ्या तप्त पदार्थांचे निरीक्षण प्रथमच झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ध्रुवाभोवती फिरणाऱ्या तप्त पदार्थांच्या अभ्यासातून सूर्याच्या वातावरणाविषयीची अनेक रहस्ये उलगडू शकतात.
या घटनेनंतर आता अंतराळ शास्त्रज्ञ या विचित्र घटनेचे विश्लेषण करत आहेत. या घटनेचे पृथ्वीवर काय परिणाम होतील याचा अंदाज लावण्यात येत आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर काही महत्त्वाची घटना घडली तर त्याचा परिणाम पृथ्वीवर होत असल्याचं दिसून येतंय.