Turkey Earthquake Damages :  पश्चिम आशियाई देश तुर्किए (Turkey Earthquake) आणि सीरियामध्ये (Syria) सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपाने मोठी हानी झाली आहे. या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये 50 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दोन्ही देशांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तुर्किए देश जवळपास उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे. देशाला सावरण्याचे मोठं आव्हान तुर्किए सरकार समोर आहे. या भूकंपात नेमंक किती नुकसान झालं, याची माहिती जागतिक बँकेने दिली आहे. 


जागतिक बँकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या विनाशकारी भूकंपाने तुर्किएचे जवळपास 34 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे दोन लाख 81 हजार कोटी इतकी होते. जागतिक बँकेने एका अहवालात ही बाब नमूद केली आहे.


6 फेब्रुवारी रोजी तुर्किएमध्ये झालेल्या दोन मोठ्या भूकंपांमुळे सुमारे 34.2 अब्ज डॉलरचे प्रत्यक्ष भौतिक नुकसान झाले. परंतु, भूकंपानंतर एकूण पुनर्बांधणी करण्याचा खर्च दुप्पट असू शकतो, असेही जागतिक बँकेने सोमवारी सांगितले.


या भूकंपाचा फटका तुर्किएच्या विकासालाही बसणार असल्याचा अंदाज जागितक बँकेने वर्तवला आहे. या भूकंपाच्या परिणामी तुर्किएच्या जीडीपीत किमान अर्धा टक्क्यांची घट होणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. जागतिक बँकेने हा वर्तवलेला अंदाज फक्त तुर्किएसाठी आहे. सीरियातमध्ये नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज स्वतंत्रपणे वर्तवण्यात येणार असल्याची माहिती  जागतिक बँकेचे युरोप आणि मध्य आशिया विभागाचे उपाध्यक्ष अॅना ब्जेर्डे यांनी दिली. 


दरम्यान, वृत्तांनुसार, तुर्किए सरकारकडून दोन लाख घरे बांधण्यात येणार असून ग्रामीण भागातील 70 हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी 15 अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. भूकंपामुळे जवळपास 1.5 दशलक्ष नागरीक बेघर झाली आहेत. त्यांच्यासाठी पाच लाख घरांची आवश्यकता आहे. अनेक प्रकल्प, बांधकामांशी निगडित प्रकल्पांची निविदा काढण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे.  सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे माहिती तुर्किए सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.


भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू 


6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरू आहे.