Ukraine-Russia Conflict: रशिया-युक्रेन युद्धाला आता एक वर्ष झालं असलं तरी यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे चीनने हे युद्ध संपवण्यासाठी एक शांतता योजना मांडली आहे.  युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या चीनच्या शांततेच्या योजनेला रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण या संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी सध्या कोणतीही अट अस्तित्वात नसल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. 


युक्रेनने चीनच्या 12 कलमी शांतता योजनेत काही चांगल्या तरतुदी असल्याचे सांगत रशियाने खुल्या मनाने विचार करावा असं आवाहन केलं आहे, तर रशियाने चीनच्या योजनेचे स्वागत केले आहे. 


 




युद्धाच्या एक वर्षानंतर चीनने दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत युद्धात अण्वस्त्रांचा वापर करू नये, असा इशाराही दिला. साहजिकच हा इशारा रशियाला देण्यात आला आहे. युद्धाचा कोणालाच फायदा होणार नसल्याचे चीनने म्हटले आहे.


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शांतता प्रयत्‍नांसाठी भारताशी चर्चा करण्याची योजना सांगितली आहे. शांततेच्या प्रयत्नांदरम्यान, अमेरिकेने युक्रेनला 2 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा देण्याची घोषणा केली आहे.


चीनने आतापर्यंत युक्रेनवरील रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध केला नाही किंवा त्याचा उल्लेख हल्ला असाही केलेला नाही. चीनने युक्रेनला अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रास्त्र पुरवठ्याचा निषेध केला आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या या भूमिकेमुळे युक्रेनमधील परिस्थिती अधिकच बिघडत आहे असा आरोप चीनने केला आहे. मात्र चीनच्या या भूमिकेवर युक्रेनने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 


झेलेन्स्कीचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, युद्धविराम झाला आणि रशियन सैन्य सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर 1991 मध्ये ज्या स्थितीत होते त्या स्थितीत परत आले तरच कोणतीही शांतता योजना पुढे जाऊ शकते. 


रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण 


गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आणि या युद्धाला सुरुवात झाली. रशिया महासत्ता असून त्याने युक्रेनसारख्या लहान देश लवकरच हार मानेल असा अनेकांचा कयास होता. युक्रेनचा रशियासमोर टिकाव लागणार नाही असं अनेकजण म्हणत असताना युक्रेनने मोठ्या हिमतीने लढा दिला. सुरुवातीच्या काळात रशियाने ताब्यात घेतलेला 54 टक्के भूभाग परत मिळवण्यात युक्रेनला यश आलं आहे.