अंकारा : तुर्कस्थानच्या लष्कराने स्वत:च्या संसदेवर थेट बॉम्बहल्ले करत, सत्ता काबिज केली आहे. त्यामुळे तुर्कस्थानमध्ये लष्करी राजवट लागू झाली आहे.  खुद्द लष्करानेच तुर्कस्थानच्या सरकारी चॅनेलवरून सत्तापालट केल्याची घोषणा केली.

 

लष्कर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत 17 पोलीस ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी आहेत. या राडेबाजीत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 120 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

राष्ट्राध्यक्ष रिसेप तईप एर्दोगन यांनी लष्कराच्या या कारवाईला  तीव्र विरोध केला आहे. तसंच त्यांनी जनतेने रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं आवाहन केलं आहे.

 

ज्यावेळी लष्कराने संसदेवर चढाई केली, त्यावेळी राष्ट्रपती एर्दोगन सुट्टीसाठी मरमरिसच्या समुद्र किनाऱ्यावर गेले होते. सैन्य दलाने सत्ता हाती घेतल्यानंतर, त्यांनी तातडीने मध्यरात्री इस्तंबूलला धाव घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सैन्य दालाची कारवाई देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर  पंतप्रधान बिनाली यिलदीरिम यांचेच हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.

 

17 पोलीस ठार, पोलिसांनी हेलिकॉप्टर उडवलं

तुर्कस्थानची सत्ता हाती घेण्यासाठी काल मध्यरात्री सैन्य दलाने उठाव करून संसदेवर हल्ला चढवला. यावेळी पोलीस आणि सैन्य दलामध्ये झालेल्या चकमकीत 17 पोलीस ठार झाले, तर  12 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी सैन्य दलाचे हेलिकॉप्टर उडवलं. तुर्की एमआयटी या गुप्तचर यंत्रणेने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करून पंतप्रधान यिलदीरिम यांनी लष्कारी स्थळ अंकाराला फ्लाय झोन म्हणून घोषित केले आहे.

 

पंतप्रधान यिलदीरिम यांनी अमेरिकन मुस्लिम मौलवी फतेउल्लाह गुलेन आपल्या अनुयायांसह उठाव करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे सैन्य दलाने ही कारवाई हाती घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच, देशावर जनतेने निवडलेलेच सरकार राज्य करेल, देशविघातक शक्तींवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. पण गुलेन यांच्या संबंधित संघटनांनी पंतप्रधानांचे हे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत.

 

आधी पोलिसांवर हल्ला, मग संसदेवर

सैन्य दलाने सत्ता हस्तगत करण्यासाठी सुरुवातीला पोलिसांच्या स्पेशल फोर्स मुख्यालयावर हल्ला केला. यात १७ पोलिसांचा मृत्यू झाला. तसेच संसदेवर कब्जा करून सेनेने इंटरनेट, सोशल मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग कंपनींना ई-मेल पाठवून सत्ता हस्तांतरणाची माहिती दिली आहे.

 

सोशल मीडियावर बंदी

लष्काराने सत्ता हस्तगत केल्यानंतर सोशल नेटवर्कींग साईट फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आदीवर तुर्कस्थानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

 

भारतीय परराष्ट्र खातं सतर्क

दरम्यान, सैन्य दलाच्या या कारवाईनंतर भारतीय परराष्ट्र खाते सतर्क झाले, असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय राजदूतात राहणाऱ्या भारतीयांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अंकारामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी +905303142203, आणि इस्तंबूलमधील भारतीय नागरिकांसाठी   +905305671095 हे हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले असल्याचे सांगितले.