इस्लामाबाद : निष्पांपाचा बळी घेणारा, अनेकांच्या घरावर नांगर फिरवणारा हिजबुलचा दहशतवादी बुरहान वाणीला पाकिस्ताननं शहीदाचा दर्जा दिलाय. इतकंच नव्हे तर भारतीय फौजांनी त्याला कंठस्नान घातल्याच्या विरोधात 19 जुलैला पाकिस्तानात काळा दिवस पाळला जाणार आहे.


 
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ही घोषणा केलीय. काश्मीरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवाज शरीफ यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. ज्यात काश्मीरातल्या दहशतवाद्यांच्या कारवायांना स्वातंत्र्य चळवळ म्हणून घोषित करण्यात आलं. तसंच या कारवायांना पाकिस्तानकडून नैतिक, राजकीय आणि मुत्सद्देगिरीचाही पाठिंबा देण्याचं ठरवलंय.

 
विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची अधिकृत भूमिका म्हणून याचा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्यात. मोदींचं सरकार आल्यानंतर पाकशी शांततेनं मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण बुरहानला कंठस्नान घातल्यानंतर पाकनं या प्रयत्नांना सुरुंग लावलाय.