बिजिंग : चीनमध्ये हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 10 जणांना फासावर लटकवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतात ही घटना घडली.


गुआंगडोग प्रांतातील सात जणांवर ड्रग्स तस्करी, तर तीन जणांवर हत्या आणि दरोड्याचे गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात या दहाही जणांवर खटला चालवण्यात आला. सुनावणीत हे सर्वजण दोषी आढळल्याने न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

विशेष म्हणजे, न्यायालयाने या सर्वांना जाहीर फाशी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने हजारो नागरिकांना सोशल मीडियाद्वारे आमंत्रित केलं होतं. या आमंत्रणानंतर हजारो नागरिक स्टेडियमवर जमा झाल्यानंतर, त्यांच्यासमोर या दहाही जणांना फासावर लटकवण्यात आलं.

ही घटना उपस्थित अनेकांनी कॅमेरॉत कैद केली असून, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबतचा अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी, अमेरिकेच्या एका एनजीओने आपला अहवाल सादर केला आहे.

एनजीओच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी चीनमध्ये तब्बल दोन हजार जणांना मृत्यू दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष म्हणजे, यातील अनेक गुन्हेगारांवर आमली पदार्थांची तस्करी, आर्थिक फसवणूक आदी गुन्हे दाखल होते.