France Lockdown | फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून मोठ्या संख्येने लोक अडचणीत येताना दिसत आहे. कोरोना बाधितांची अनियंत्रित आकडेवारी पाहता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केलं आहे. येत्या चार आठवड्यांसाठी देशभरात हे लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. फ्रान्समधील रोज नोंद होणाऱ्या कोरोना बाधितांची आकडेवारी आणि महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसात जवळपास सारखीच आहे.  


फ्रान्समध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन 


फान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल म्हणाले की, "जर आपण आता हे पाऊन उचललं नाही तर कोरोनावरील आपली पकड सर्व प्रकारे गमावून बसू. लॉकडाऊन दरम्यान केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर कार्यालयातील लोकांना फक्त घरुन काम करावे लागेल. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. या चार आठवड्यांत कोणत्याही प्रकारची जाहीर सभा होणार नाही, त्यांच्यावर पूर्ण बंदी असेल."


लोकांना घाबरण्याची गरज नाही, फक्त कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करा - इमॅन्युएल


राष्ट्रपती इमॅन्युएल पुढे म्हणाले की,  कोणीही आवश्यक कारणाशिवाय आपले घर सोडणार नाही. देशातील जनतेला आवाहन करत ते म्हणाले की सध्याची परिस्थिती नियंत्रित केली जाऊ शकते. लोकांना घाबरण्याची गरज नाही तर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. 


फ्रान्समधील कोरोनाची एकूण आकडेवारी 46.46 लाखांवर


फ्रान्समधील कोरोनाची एकूण आकडेवारी 46.46 लाखांवर गेली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढून 95 हजार 502 झाला आहे. बातम्यांनुसार कोरोनामुळे सध्या आयसीयूमध्ये 5000 लोक दाखल आहेत. ब्रिटनहून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे फ्रान्समध्ये कोरोनाची स्थिती अतिवाईट बनली आहे.  फ्रान्समध्ये काल 29 हजार 575 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 28 मार्च रोजी ही संख्या 41 हजारांच्या पुढे गेली होती.