Mumbai Terror Attack Hafiz Saeed : मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद (Hafiz Saeed) आता पाकिस्तानच्या निवडणुकीत (Pakistan Election 2024) उतरणार आहे. याआधीच आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हाफिज सईद सक्रिय होता. आता निवडणुकीत उतरणार आहे. हाफिज सईदच्या मरकजी मुस्लिम लीग (PMML) आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. याची घोषणा हाफिजने केली आहे. हाफिजच्या पक्षाने संसदीय आणि राज्यांच्या विधानसभेच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हाफिजचा मुलगा तल्हा सईददेखील आपले नशीब आजमावणार आहे. 


हाफिजचा मुलगा तल्हा हा नॅशनल असेंब्ली मतदारसंघ  लाहोरमधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, पीएमएमएलचे केंद्रीय अध्यक्ष खालिद मसूद सिंधू हा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. हाफिज सईदच्या या पक्षाचे निवडणूक चिन्ह खुर्ची आहे.


पाकिस्तानातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा


PMML च्या प्रवक्त्याने पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ला सांगितले की त्यांच्या पक्षाने देशभरातील सर्व संसदीय जागा आणि प्रांतीय जागांसाठी उमेदवार उभे करणार आहेत. आम्ही एकही जागा  सोडली नसल्याचा दावा ताबीश कय्युम यांनी केला. मात्र, इतर पक्षांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आघाडी करत त्यांच्यासाठी काही जागांवरून उमेदवार मागे घेणार असल्याचे हाफिजच्या पक्षाने स्पष्ट केले. 


बंदीच्या आधी मिल्ली मुस्लिम लीग नावाने सक्रिय


PMML ने 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिल्ली मुस्लिम लीग, बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा म्हणून भाग घेतला होता, परंतु कोणत्याही मतदारसंघातून आशादायक निकाल मिळवण्यात अयशस्वी झाले. सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने जमात-उद-दावा आणि त्याच्या राजकीय गट मिल्ली मुस्लिम लीगवर बंदी घातली तेव्हा त्याचे नाव बदलून पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग असे ठेवले.


पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात


पाकिस्तान मरकाझी मुस्लिम लीगचे प्रवक्ते कय्युम यांनी सांगितले की त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष फैसल नदीम कराची, एआर नक्वी पीपी-156 मधून, हाफिज अब्दुल रौफ NA-119 मधून, खालिद नाईक गुजर पीपी-162 मधून, पंजाबचे सरचिटणीस मुझम्मिल इक्बाल हाश्मी  गुजरानवाला येथून निवडणूक लढवत आहेत.


हाफिज सईद कोण आहे?


हाफिज सईद हा मुंबईवर 26 नोव्हेंबर  2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. हाफिज हा जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे. दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानच्या कोर्टाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष म्हणून सुटका केली. तर, भारतीय कोर्टाने झालेल्या खटल्यात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.