Terrorist Attack in Somalia : सोमालियाची (Somalia) राजधानी मोगादिशू (Mogadishu) येथील प्रसिद्ध हयात हॉटेलवर (Hayat Hotel) शुक्रवारी (19 ऑगस्ट) रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचं ऑपरेशन पूर्ण झालं आहे. हल्ल्याच्या सुमारे 30 तासांनंतर सोमाली सुरक्षा दलांनी हॉटेल पूर्णपणे ताब्यात घेतलं. या हल्ल्यात 40 नागरिकांचा मृत्यू झाला. अल शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वाकारली होती. दरम्यान सुरक्षारक्षकांच्या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोमालिया सरकार आज (21 ऑगस्ट) याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे.
26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे सोमालियात हल्ला
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 नागरिक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले आहे. मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हा हल्ला होता. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करुन नागरिकांचा जीव घेतला तर अनेकांना ओलीस ठेवलं होतं. सोमाली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी हयात हॉटेलवर अल-शबाबशी संबंधित अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
शुक्रवारी रात्री मोगादिशूमधील हयात हॉटेलमध्ये सोमाली सुरक्षा दल आणि अल-शबाब दहशतवादी यांच्यात चकमक झाली तसंच तीन स्फोट देखील झाले. सोमालीमध्ये हे हॉटेल राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांचं पसंतीचं ठिकाण समजलं जातं. स्थानिक मीडियानुसार, सुरक्षा अधिकारी आणि हल्लेखोरांमध्ये सुमारे 30 तास गोळीबार सुरु होता.
अल-शबाबने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी दोन कारमध्ये बॉम्बस्फोट केले आणि अंदाधुंद गोळीबारही केला. एक कार हॉटेलजवळील गतिरोधकाला तर दुसरी हॉटेलच्या गेटला धडकली. दोन्ही गाड्यांमध्ये जोरदार स्फोट झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.
हल्लेखोरांनीही अंदाधुंद गोळीबार केला. मृतांमध्ये बहुतांश सामान्य नागरिक आहेत. हॉटेलमध्ये अनेक स्फोटांचे आवाजही ऐकू आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी लहान मुलांसह अनेकांची सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी हॉटेलच्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी बाहेर स्फोट केला होता.
भारत सोमालियाच्या पाठीशी उभा
सोमालियाची राजधानी मोगादिशू इथल्या हयात हॉटेलवर अल-शबाबने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत भारताने मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत सोमालिया सरकार आणि लोकांच्या पाठीशी उभा आहे."
संबंधित बातम्या