Somalia Terror Attack : सोमालियामध्ये (Somalia) मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच, हॉटेलमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. तब्बल 14 तासांनंतर ऑपरेशन संपलं आहे.  


सोमालियात (Somalia) मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोगादिशूमधील (Mogadishu) आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू 


हयात हॉटेलवर अल-शबाबच्या हल्ल्यातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आलेली नाही. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. तब्बल 14 तास सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना लढा दिला. अखेर 14 तासांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 


वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दोन कारमध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर शस्त्रांसह दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी इमारतीत घुसण्यापूर्वी हॉटेलच्या बाहेर स्फोट केले. शनिवारी पहाटे गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. सुरक्षा दल आणि हॉटेलमध्ये लपलेले दहशतवादी यांच्यात शनिवारी सकाळपर्यंत चकमक सुरू होती. तब्बल 14 तासांनी ऑपरेशन संपलं असून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. 


प्रत्यक्ष दर्शींचा अंगावर काटा आणणारा अनुभव 


हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी अब्दुल्लाही हुसैन यांनी फोनवर एपी न्यूज एजन्सीला सांगितलं की, "आम्ही हॉटेलच्या लॉबीजवळ चहा घेत होतो, तेव्हा आम्हाला स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकू आले. मी ताबडतोब तळमजल्यावरील हॉटेलच्या खोल्यांकडे धाव घेतली आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. त्यांनी सांगितलं की, दहशतवादी थेट वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. सुरक्षा दलांनी येऊन माझी सुटका करेपर्यंत मी माझ्या खोलीत बंद होतो. ते म्हणाले की, बाहेर जाताना मला रिसेप्शनजवळ अनेक मृतदेह पडलेले दिसले.