Taliban IIM-K meet : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संस्थेमार्फत तालिबानमधील (Taliban) राजकीय लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी एक विशेष ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केला आहे. ज्यामध्ये तालिबानचे काही सदस्यही सहभागी होत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये (India Afghanistan) याबाबतच्या एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. 'Immersing With Indian Thoughts' या अभ्यासक्रमावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जगभरातील एक दोन देश वगळता कोणत्याही देशाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. तालिबानच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असं असताना तालिबानीसाठी एखादा अभ्यासक्रम  सुरु करणं कितपत योग्य आहे, याबाबत चर्चा सुरु आहे. 


भारत आणि तालिबान या दोन देशामध्ये 'Immersing With Indian Thoughts' या ऑनलाइन अभ्यासक्रमावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आयआयएम कोळीकोड या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालिबानमधील राजदूत आणि राजनयिक कर्मचारी या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.  


काबूल येथील भारतीय दुतावासाने करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये असे म्हटलेय की, जागतिक स्तरावरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा अभ्यासक्रम करार केला जात आहे. या कराराअंतर्गत तालिबानमधील राजकीय नेते तसेच उच्चपदस्थ अधिकारी प्रशिक्षण घेणार आहे. या सर्वांना काबूल येथील अफगान इंस्टिट्यूट ऑफ डिप्लोमेसी येथे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कोळीकोड या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. 


आयआयएम कोळीकोड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना भारतातील व्यावसायिक वातावरण, सांस्कृतिक वारसा आणि रेगुलेटरी इकोसिस्टमबद्दलची माहिती आणि समज मिळेल. Immersing With Indian Thoughts या अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात 14 मार्च ते 17 मार्च यादरम्यान असेल. 
 
अभ्यासक्रमावर अफगाण पत्रकाराची टीका -


अफगानिस्तानचे पत्रकार बिलाल सर्वरी यांनी या अभ्यासक्रमावर टीकास्त्र सोडलेय. एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलेय की, 'भारत सरकारने तालिबानसाठी Immersing With Indian Thoughts हा विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. 14-17 मार्च 2023 पर्यंत हा ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम असेल. प्रशासनात सुधारणा करण्याचाचा प्रयत्न करणार्‍या तालिबानी अधिकार्‍यांवर या अभ्यासक्रमाचा किती परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.' अल्पकालीन अभ्यासक्रमाची नव्हे तर अफगाणिस्तानमध्ये संतुलित आणि ठोस धोरणात्मक नितीची गरज आहे, असेही बिलाल याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. अफगाणिस्तानमध्ये जवळपास 3,000 अफगाण विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मदत केली पाहिजे, असेही बिलाल यांनी म्हटलेय.