काबुल : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या मैत्रीचे प्रतिक असणाऱ्या धरणाला तालिबानी दहशतवाद्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शनिवारी रात्री सलमा धरणावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 10 पोलीस कर्मचारी मृत्युमूखी पडले.

भारताच्या सहकार्याने सलमा धरण बांधण्यात आलं आहे. याच्या उभारणीसाठी भारताने तब्बल 17 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या धरणाचे लोकार्पण झाले होतं. तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातील चश्ता जिल्ह्यातील एका चौकीवर शनिवारी रात्री हल्ला केला. या धरणापासून साधारण 13 किमी. अंतरावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात 10 पोलीस मृत्युमूखी पडले तर, चार पोलीस गंभीर जखमी झाले.

या हल्ल्यानंतर अफगाणिस्तामधील भारताचे राजदूत मनप्रीत वोहरा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, हा हल्ला धरणाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हता. हा हल्ला धरणापासून काही अंतरावर झाला आहे.

तर अफगाणिस्तानमधील सिन्हुआ या वृत्तसंस्थेनं एका सुरक्षा रक्षकाच्या हवाल्याने सांगितलं की, तालिबानी दहशतवाद्यांनी धरणापासून जवळच्याच अंतरावर असलेल्या पोलीस चौकीवर हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.

दरम्यान, भारत-अफगाणिस्तानच्या सहकार्याने उभारण्यात आलेलं सलमा धरण भारताच्या कुटनितीचाच भाग असल्याचं मानलं जातं. या धरणाच्या माध्यमातून पश्चिम हेरात प्रांतातील तब्बल 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आलं. तसेच यातून तब्बल 42 मेगावॅट वीजेचं उत्पादन होतं.