व्हर्जिनिया (अमेरिका): अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, 'सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वात परराष्ट्र मंत्रालयानं तीन वर्षात 80 हजार लोकांना मदत केली आहे. त्या रात्री दोन वाजताही भारतीय नागरिकांची मदत करतात.'


सुषमा स्वराज यांच्या कामाचं कौतुक करताना मोदी म्हणाले की, 'भारतीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचं मंत्रालय सोशल मीडियाच्या अतिशय प्रभावीपणे वापर करतं. सोशल मीडिया खूपच शक्तिशाली माध्यम आहे. मी देखील त्याच्याशी जोडला गेलो आहे. पण परराष्ट्र मंत्रालय आणि सुषमा स्वराज यांनी याबाबत एक आदर्श निर्माण केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही मंत्रालयाला आणखी बळकटी देता येऊ शकते.'

जगात कुठेही अडकलेल्या भारतीयांना ट्विटरवर लवकरात लवकर उत्तर देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याच्या सुषमा स्वराज यांच्या सवयीचंही मोदींनी कौतुक केलं आहे.

'जगातील कोणत्याही भागात अडकलेल्या भारतीय व्यक्तीनं जर परराष्ट्र मंत्रालयाला ट्विट केलं तर सुषमा स्वराज 15 मिनिटाच्या आता त्याला उत्तर देतात. मग हवं तर दिवस असो वा रात्र. सरकार तात्काळ पावलं उचलतं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. मागील तीन वर्षात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं कूटनितीमध्ये एक नवी उंची गाठली आहे.' असंही मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी उज्मा अहमदच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. 'भारतातील एक मुलगी जी पाकिस्तानात अडकली होती. ती भारतीय उच्चायुक्ताच्या प्रयत्नांमुळे भारतात सुखरुपपणे परतली. याचं श्रेय हे सुषमा स्वराज यांना जातं.