2014 मध्ये पाकिस्तानातील पेशावरमधल्या आर्मी स्कूलमध्ये गोळीबार करुन चिमुरड्यांचे बळी घेणारा दहशतवादी सध्या अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहे. या दहशतवाद्याचा ताबा पाकिस्तानला देऊन त्याच्या बदल्यात पाककडे असलेले कुलभूषण जाधव यांना देण्याचा प्रस्ताव आल्याचं आसिफ यांनी सांगितलं.
प्रस्ताव देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तो दहशतवादी कोण आहे, याविषयी मात्र आसिफ यांनी मौन पाळलं आहे.
एशिया सोसायटीमध्ये केलेल्या भाषणानंतर आसिफ यांनी उपस्थितांना ही माहिती दिली.
अफगाणिस्तानातील संघर्ष आणि अस्थिरतेमुळे पाकला प्रचंड त्रास होत असल्याचंही आसिफ यांनी सांगितलं. धार्मिक शांतता आणि विकासासाठी पाकिस्तानच्या धोरणांबाबत आसिफ यांनी या परिषदेत मतं मांडली.
हेरगिरीच्या आरोपातून पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केली आहे. कुलभूषण यांनी हेरगिरी केल्याची कबुली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता.
त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा एक व्हिडिओही पाकने शेअर केला आहे. दहा मिनिटांचा हा व्हिडिओ एप्रिल 2017 मध्ये शूट केल्याची माहिती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देण्यात आली आहे.
2005 आणि 2006 मध्ये आपण कराचीचा दौरा केल्याचे जाधव सांगत असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओत 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्यांना भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानात हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं जाधव सांगताना दाखवलं आहे.
मे महिन्यात आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेल्या सुनावणीत भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. “महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये”, असं आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठणकावून सांगितलं होतं.
इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला होता. व्हिएन्ना कराराचा दाखला देत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.