न्यूयॉर्क : दहशतवाद्यांचा कारखाना बनलेल्या पाकिस्तानने अखेर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी असल्याचं मान्य केलं आहे. तसेच सईदसारख्या दहशतवाद्यांसाठी आम्हाला दोषी धरु नका, असं विनवणी पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.


आसिफ मंगळवारी अशिया सोसायटी फोरमला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, "इस्लामाबादची सर्व सूत्रं हक्कानी नेटवर्क, हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबाच्या हाती आहेत, हे म्हणणं सहज सोपं आहे. पण हे लोक आमच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्यापासून पिछा सोडवण्यासाठी पाकिस्तानाला थोडा वेळ जाईल, कारण, सध्या या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी पाकिस्तानकडे पुरसा पैसादेखील नाही."

ते पुढं म्हणाले की, "अम्हाला हक्कानी नेटवर्क आणि हाफिज साईदसाठी दोष देऊ नका. कारण, 20 ते 30 वर्षांपूर्वी हे तुम्हाला (अमेरिकेला) प्रिय होते. या लोकांचं व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत होत होतं. आणि आता तुम्ही म्हणता, पाकिस्ताननं नर्कात जावं, कारण, या लोकांना पाकिस्ताननं पोसलं आहे."

यावेळी अफगाणिस्तान प्रश्नावरुनही आसिफ यांनी अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. "अफगाणिस्तानात शांतता प्रस्तापित व्हावी, अशी पाकिस्तानची पण इच्छा आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण शांतता प्रस्थापित करण्यात पाकिस्तानलाही काही मर्यादा येत आहेत. एकटा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या शांततेची जबाबदारी घेऊ शकत नाही. यासाठी जगातल्या ज्या काही बलाढ्य महाशक्ती आहेत, त्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत." असं त्यांनी यावेळी सांगितलं.

हाफिज सईद 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्लात एकूण 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भारताकडून सातत्यानं मागणी होत आहे.