न्यूयॉर्क : सीमेवरील पाकिस्तानच्या नापाक हरकतींमुळे दोन्ही देशांचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. याचा परिणाम संयुक्त राष्ट्रामध्ये (यूएन) सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही पाहायला मिळाला. वेस्टिन हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे देखील उपस्थित होते. मात्र दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत आपलं भाषण झाल्यानंतर सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.
सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने शाह महमूद कुरेश चवताळलेले दिसून आले. ''मी त्यांचं भाषण ऐकलं. त्यांनी क्षेत्रीय सहकार्याबाबत भाष्य केलं. क्षेत्रीय सहभाग कसा शक्य आहे, जर कुणी एकमेकांचं म्हणणं ऐकतच नसेल आणि तुम्ही त्याला ब्लॉक करत असाल,'' असं वक्तव्य त्यांनी केलं. ''त्यांची (सुषमा स्वराज) तब्येत बरी नव्हती, की काय ते माहित नाही. पण मी त्यांचं सर्व भाषण ऐकलं आणि त्या माझ्या भाषणासाठीही थांबल्या नाही,'' असं शाह महमूद कुरेशी म्हणाले.
सार्कची मागची बैठक भारतच नाही, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशकडूनही दहशतवादाबद्दल व्यक्त केलेल्या चिंतेनंतर रद्द झाली होती, तुमच्यासाठी दहशतवाद हा मुद्दाच नाही का, असा सवाल एबीपी न्यूजने विचारला. यावरही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं. आजच्या बैठकीत दहशतवादाचा मुद्दा अफगाणिस्तानने नाही, किंवा बांगलादेशनेही नाही उचलला. क्षेत्रीय वातावरण नीट होईपर्यंत सार्क बैठक रद्द करावी हा भारताने काढलेला तर्क कमकुवत आहे. नीट वातावरण काय आहे हे कोण निश्चित करणार? जगातील इतर देश बातचीत करत असतील तर सार्क समूह बातचीत का करु शकत नाही? दक्षिण आशियातील एक अब्ज 78 कोटी लोकांना हे निश्चित करावं लागेल की त्यांचं भलं कोणत्या देशाच्या हट्टासमोर गहाण ठेवलं जात आहे, असं शाह महमूद कुरेशी म्हणाले.
सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला घाम फोडला
न्यूयॉर्कमध्ये सार्कच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला घाम फोडला. ''क्षेत्रीय आर्थिक विकास, सुरक्षा आणि समृद्धीसाठी शांती गरजेची आहे. दहशतवाद दक्षिण आशिया क्षेत्र आणि जगासमोर मोठं आव्हान आहे. कोणत्याही भेदभावाविना दहशतवाद नष्ट करावा लागेल आणि याला संरक्षण देणाऱ्या शक्तीलाही नष्ट करणं गरजेचं आहे,'' असं सुषमा स्वराज म्हणाल्या.
''आपलं क्षेत्र आणि जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद प्रत्येक स्वरुपात नष्ट करायला हवा आणि यासाठी सहकार्य गरजेचं आहे,'' असं म्हणत पाकिस्तानने भारतावर सार्क बाबत जे आरोप केले आहेत, त्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आणि आरोप निराधार असल्याचं सांगितलं.
न्यूयॉर्कमध्ये सार्क देशांच्या बैठकीत कुणीही भाव न दिल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला. सार्कच्या मार्गातील भारत हा सर्वात मोठा अडथळा आहे, असा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. एबीपी न्यूजने प्रश्न विचारला तेव्हीही पाकिस्तानकडून हेच उत्तर देण्यात आलं की भारताकडून आरोप केला जातोय, पण नीट वातावरण काय आहे, हे निश्चित कुणी करावं.
काय आहे सार्क?
सार्क म्हणजेच South Asian Association for Regional Cooperation ही एक क्षेत्रीय संघटना आहे, ज्यात भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुटान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने पाक परराष्ट्र मंत्र्यांचा तिळपापड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2018 11:06 AM (IST)
दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत आपलं भाषण झाल्यानंतर सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -