अंकारा (तुर्कस्तान) : तब्बल 44 वर्षांपूर्वी हत्या झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह तुर्कस्तानात सापडला. हा मृतदेह सापडण्याचं कारण अत्यंत आश्चर्यकारक आहे. मृत्यूपूर्वी खाल्लेल्या फळाच्या बिया पोटात रुजून त्यातून झाड उगवल्यामुळे या व्यक्तीचा ठावठिकाणा लागला.


1974 मध्ये अहमत हरगुन या व्यक्तीची हत्या झाली होती. ग्रीक आणि तुर्किश गट एकमेकांना भिडल्यानंतर अहमतसह काही जणांची हत्या करण्यात आली होती. अहमतच्या कुटुंबीयांनी कित्येक वर्ष त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.

तुर्कस्तानातील डोंगररांगांमध्ये अंजीराचं झाड आढळल्याने शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं होतं. या भागात अंजीराची झाडं सहसा सापडत नाहीत. त्यातही या परिसरात अशाप्रकारचं एकच झाड सापडल्यामुळे शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली.

झाडाखाली खोदकाम केल्यानंतर ती मानवी सांगाड्यातून उगवल्याचं शास्त्रज्ञांना सापडलं. त्याच भागात आणखी दोन मृतदेहही सापडले. या तिघांना गुहेत नेऊन स्फोट घडवून ठार मारण्यात आल्याचं समोर आलं आहे.

अहमतने मृत्यूपूर्वी अंजीर खाल्लं होतं. हत्येनंतर त्याच्या पोटातील फळाच्या बियांमधून झाड उगवलं, अशी माहिती 'डेली मिरर' वृत्तपत्राने दिली आहे. आपल्या भावाचा शोध लावल्याबद्दल अहमतच्या 87 वर्षीय बहिणीने आभार व्यक्त केले.