Superbug Cases in US : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दोन वर्षाममध्ये कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरियंटने करह माजवला. आता पुन्हा एकदा कोविड संसर्गाची नवी लाट पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एका विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. सध्या सुपरबग बॅक्टेरियाचा (Superbug Bacteria) धोका निर्माण झाला आहे. या सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनिटेलियम (Mycoplasma Genetalium) असे आहे. अमेरिकेत मानवांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबग विषाणूमुळे धोका वाढला आहे. त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे.


अमेरिकेत वेगाने पसरतोय सुपरबग


गेल्या काही वर्षांत सुपरबग जिवाणू सुपरबग वैद्यकीय शास्त्रासमोर एक मोठे आव्हान म्हणून समोर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना आणि सुपरबगचा संसर्ग अधिक धोकादायक बनत आहे. काही दिवसांपासून अमेरिकेत वेगाने पसरणाऱ्या सुपरबग जिवाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.लॅन्सेट या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाच्या अहवालानुसार, सुपरबग जिवाणू याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी एक कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.


सुपरबगवर औषधांचाही परिणाम नाही


सध्या या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटी-फंगल औषधे देखील सुपरबग्सवर परिणाम करत नाहीत, असे लॅन्सेटच्या संशोधनातून समोर आले आहे. हा सुपरबग जगासाठी नवीन प्रकारचा धोका निर्माण करत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


सुपरबग काय आहे?


सुपरबग म्हणजे रुग्णाच्या शरीरात असलेले जीवाणू, विषाणू आणि परजीवी ज्यांच्यावर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत. सुपरबग (Superberg) हा जीवाणूंचा (Bacteria) एक प्रकार आहे. काही जीवाणू मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. सुपरबग मानवांसाठी घातक आहे. हा जीवाणू (Bacteria), विषाणू (Virus) आणि परजीवी (Parasite) यांचा एक प्रकार आहे. जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी हे काळानुसार बदलतात, तेव्हा औषधांचा त्यांच्यावरील परिणाम कमी होते. त्यांच्यामध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. त्यामुळे संसर्गावर उपचार करणे खूप कठीण होते. 


सुपरबग कसा पसरतो?


त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे सुपरबग्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात. सुपरबग मानवी शरीरात गेल्यावर औषधांचा रुग्णावर परिणाम होणे थांबते. सुपरबग्सवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही, पण योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास याचा धोका टाळता येऊ शकते.


कोरोना आणि सुपरबगचा दुहेरी धोका


लॅन्सेटने कोरोना काळात काही दिवसांपूर्वी सुपरबगमुळे झालेल्या मृत्यूंच्या संदर्भात अभ्यास केला आहे. या अहवालानुसार, 2021 मध्ये, ICMR ने 10 रुग्णालयांमध्ये एक अभ्यास केला. यामध्ये असे आढळून आले की, कोरोना विषाणूनंतर लोकांनी जास्त अँटीबायोटिक्स वापरण्यास सुरुवात केली आहे.


अँटिबायोटिक्स अतिवापर आणि सुपरबग्समुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कोविड रुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचारादरम्यान किंवा नंतर बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे संसर्ग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, जगात अँटिबायोटिक्स वापर याच प्रमाणात वाढत राहिला तर मोठा धोका निर्माण होईल.


अँटिबायोटिक्सचा अतिरेक धोकादायक


लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे रूग्णालयात असल्‍यामुळे एएमआरचा (AMR - Antimicrobial Resistance) भार वाढला आहे. याचे एक कारण म्हणजे कोरोनाच्या उपचारादरम्यान बहुतांश रुग्णांना अँटीबायोटिक्स देण्यात आली होती. अँटिबायोटिक्सचा अतिरेक धोकादायक आहे.


सुपरबग्समुळे कोणते रोग होतात?


2021 मध्ये, अमेरिकेतील 10 हून अधिक संशोधनांमध्ये असे आढळून आले की सुपरबग्समुळे महिलांमध्ये प्रीमॅच्यॉर बर्थ धोका वाढतो. तर, पुरुषांना लघवीशी संबंधित समस्या जाणवतात. तसेच मानवांवर याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांबाबत अद्याप संशोधन सुरु आहे.