Superberg Bacteria Origin, Symptoms, Treatment : अमेरिकेमध्ये (America) वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने (Superberg) संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या सुपरबगमुळे मानवांला लैंगिक संक्रमित रोग (STI) होतात, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. सुपरबग हा साधारणपणे बॅक्टेरियाचे एक प्रकार असतो. मानवी शरीरात अनेक जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. काही बॅक्टेरिया हानिकारक नसतात आणि काही अत्यंत धोकादायक असतात. या सुपरबगचे (Bacteria) नाव मायकोप्लाझ्मा जेनिटालियम (Mycoplasma Genetalium) आहे. हे इतके धोकादायक आहे की आतापर्यंत यावर जे काही अँटीबायोटिक उपचारासाठी वापरले जाते, हे बॅक्टेरिया त्या सर्वांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते. त्यामुळे डॉक्टरांनाही उपचार करणे कठीण होत आहे.
सुपरबगवर उपचार करण्याचे आव्हान
मायकोप्लासमा जेनिटेलियम (Mycoplasma Genetalium) हा सुपरबग अतिशय धोकादायक आहे. या सुपरबगवर आतापर्यंत जे अँटीबायोटिक उपचारासाठी वापरले जाते, त्या सर्वांविरोधात हा सुपरबग प्रतिकारशक्ती निर्माण करते. त्यामुळे डॉक्टरांनाही यावर उपचार करणे कठीण झाले आहे.
कुठे सापडला सुपरबग?
सुपरबग जीवाणू सर्वात पहिल्यांदा 1980 मध्ये लंडनमध्ये सापडला होता. पण 2019 मध्ये पहिल्यांदाच या आजारावर अमेरिकेत संशोधन सुरू झाले. सध्या ही चाचणी फक्त अमेरिकेमध्ये मर्यादित आहे. हा जीवाणू जगाच्या कोणकोणत्या देशात पसरला आहे याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.
सुपरबग कसा पसरतो?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक संबंधादरम्यान या जीवाणूचा प्रसार होऊ शकतो. तसेच हा बॅक्टेरिया जन्मापूर्वी आईकडून बाळाकडे जाऊ शकतो. सुपरबग्समुळे होणाऱ्या आजारांमुळे जगात दरवर्षी 7 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.
सुपरबगची लक्षणे काय?
रिपोर्टनुसार, सुपरबगच्या बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. हा विषाणू मानवी शरीरात अनेक वर्षापर्यंत राहू शकतो. सुपरबर इतर लैंगिक संक्रमित रोगांपेक्षा अधिक धोकादायक आहे. त्याची लक्षणे त्वरीत दिसत नसल्यामुळे त्याचे उपचार करणे देखील अवघड आहे.
सुपरबगमुळे माणूस हळूहळू आजारी पडतो
सुपरबगमुळे जननेद्रियांच्या भागांमध्ये रक्तस्त्राव, सूज आणि वेदना होऊ शकतात. तसेच, यामुळे महिलांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते.
सुपरबगस कसे तयार होतात?
कोणत्याही अँटीबायोटिक औषधाच्या अतिवापरामुळे किंवा अँटीबायोटिक औषधांचा विनाकारण वापर केल्यामुळे सुपरबग्स तयार होतात. डॉक्टरांच्या मते, फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गावर अँटीबायोटिक्स घेतल्यावर सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते. या इतरांना देखील हळूहळू संसर्ग होतो.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या देशात न्यूमोनिया आणि सेप्टिसिमियाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी कार्बापेनेम ही औषधे आता सुपरबग जीवाणूंवर परिणामकारक राहिलेली नाहीत. त्यामुळे या औषधांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे.
सुपरबगचा संसर्ग कसा टाळाल?
- सुपरबगचा संसर्ग टाळण्यासाठी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
- हँड सॅनिटायझर वापरा.
- खाद्यपदार्थ स्वच्छ ठिकाणी ठेवा.
- नीट शिजवलेले अन्नपदार्थ खा.
- स्वच्छ पाणी प्या.
- आजारी लोकांशी संपर्क टाळा.
- डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही अँटिबायोटिक्सचा वापर करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.