Suez Canal : इजिप्तच्या सुएज कालव्यात मागील सहा दिवसांपासून अडकलेलं विशाल कार्गो जहाज आज अखेल हललं आहे.  'EVERGREEN' नावाचं हे विशाल जहाज आज पुन्हा सुरु झालं.  इन्च केप शिपिंग सर्व्हिसेसनं याबाबत माहिती दिली आहे. सुएज कालवा प्राधिकरणाने याआधी माहिती दिली होती की विशालकाय कंटेनर जहाजाला अंशत: बाहेर काढलं आहे. हे जहाज निघाल्यामुळं संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.  






आशिया आणि युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा गेल्या काही दिवसांपासून ब्लॉक झाला होता. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या चिंचोळ्या कालव्यात अडकलं. त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली असून जगाचे दर तासाला तब्बल 2800 कोटी रुपयांचे नुकसान होत होतं. महत्वाचं म्हणजे या एव्हरग्रीन जहाजावरील सर्व 25 क्रू भारतीय आहे. 


इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे समद्रातील 193.3 किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दं झाली आहेत. सध्या सुएज कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. सुएज कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागराला हिंदी महासागराशी जोडतो, म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो.


Suez Canal | कार्गो शिपने केला सुएज कालवा 'ब्लॉक', जगाचं तासाला 2800 कोटी रुपयांचं नुकसान


मंगळवारी सकाळी 7.40 च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कालव्यात फसलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे 400 मीटर लांबीचं आणि 59 मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात फसलं. त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झालं होतं. बुधवारी इजिप्तच्या प्रशासनाकडून कालव्यात हे फसलेलं जहाज बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी आठ टगबोट्सचा वापर करण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 


याच समुद्री मार्गाने रोज जवळपास सरासरी 90 मोठी जहाजं आणि इतर अनेक लहान जहाजं प्रवास करतात. सुएज कालव्यात हे महाकाय जहाज अडकल्याने जगाची तासाला सुमारे 2800 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था थांबलीय. या जहाजाचा मालक जपानी व्यक्ती आहे. यामुळं चार दिवसात जवळपास 400 जहाजांची वाहतूक बंद झाली आहे.  हा कालवा ब्लॉक झाल्याने रोज जवळपास सरासरी 9.7 बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक थांबली होती. त्यामध्ये 5.1 बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पश्चिमी देशांची आहे तर 4.6 बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पूर्वेकडच्या देशांची आहे.