नवी दिल्ली : जगाच्या व्यवसायाचा कणा मानल्या जाणार्‍या इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये अडकलेलं मालवाहू जहाज सुरक्षित बाहेर निघाल्यानंतर आज भारतासह आशिया आणि युरोपमधील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या महाकाय जहाज अडकल्याचा परिणाम भारतीय व्यापारावरही होत होता. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने कृती आराखडा देखील तयार केला होता. अन्य देशांकडून आयात-निर्यातीमध्ये गुंतलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजांना सुएझ कालव्याची कोंडी टाळण्यासाठी केप ऑफ गुड होप (Cape of Good Hope) हा अत्यंत लांब समुद्री मार्ग वापरण्याचा सल्ला दिला होता.


हे जहाज आणखी काही दिवस अडकले असते तर अनेक देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आली असती, असे तज्ञांचे म्हणणे आहे. भारतालाही प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची भीती होती. आशिया आणि युरोप दरम्यान 'एव्हरग्रीन' नावाच्या विशाल जहाजाचा सलग सहा दिवस समुद्रात अडकल्याचा परिणाम होणार आहे. कारण गेल्या अनेक आठवड्यांपासून बऱ्याच देशांचा माल बंदरांवर पोहोचलेला नाही. त्याला अधिक वेळ लागेल. ज्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.


या जहाजाच्या अडकल्याने समुद्राच्या मोठ्या भागात वाहतुककोंडीचे असे दृश्य दिसत होते, जे सहसा महानगरांच्या रस्त्यावर दिसते. या जाममध्ये सुमारे 150 जहाजे अडकली असून त्यात 13 दशलक्ष बॅरेल कच्च्या तेलाने भरलेल्या सुमारे दहा क्रूड टँकरचा समावेश होता. यामुळे बर्‍याच देशांत पेट्रोलियम पदार्थांचे वितरणास विलंब झाला आहे. मालवाहू जहाज अडकल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आणि यामुळे तासाला सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे.


विशेष म्हणजे जागतिक व्यापाराचा कणा म्हणून ओळखले जाणारा सुएझ कालवा जगातील मुख्य समुद्रीमार्गापैकी एक आहे. जगातील एकूण व्यवसायापैकी हे 12% मालाची येथूनच वाहतूक होते. अशा परिस्थितीत चीनकडून नेदरलँडला जाणारे मालवाहू जहाज धुळीच्या वादळामुळे मंगळवारी सकाळी कालव्यात अडकले आणि समुद्रात वाहतूक कोंडी झाली.


पूर्व आणि पश्चिमेला एकत्र करण्यासाठी सुएझ कालवा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. सुएझ कालवा ही 193 किमी लांबी आहे, जी भूमध्य समुद्र ते लाल समुद्र दरम्यान आहे. आशिया आणि युरोपमधील हा सर्वात छोटा समुद्री दुवा आहे. या कालव्यामध्ये तीन नैसर्गिक तलावांचा समावेश आहे. 1869 पासून कार्यरत या कालव्याचे महत्त्व यासाठी आहे, की पूर्व आणि पश्चिम भागात ये-जा करणाऱ्या जहाजांना पूर्वी आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकाकडे असणाऱ्या केप ऑफ गुड होप मार्गाचा वापर करावा लागत होता. या जलमार्गाच्या निर्मितीनंतर, युरोप आणि आशियातील जहाजे पश्चिम आशियाच्या या भागात जाण्यास सुरुवात झाली. विशेष बाब म्हणजे या कालव्याच्या निर्मितीनंतर आशिया आणि युरोपला जोडणार्‍या जहाजांना नऊ हजार किलोमीटर अंतर कमी जावे लागत आहे, जे एकूण अंतराच्या 43 टक्के आहे.


एका अंदाजानुसार, सुएझ कालव्यावरून 19 हजार जहाजांमधून दरवर्षी 120 कोटी टन मालाची वाहतूक केली जाते. दररोज 9.5 अब्ज डॉलर्सची मालवाहतूक या कालव्यातून होते. त्यापैकी सुमारे पाच अब्ज डॉलर्स पश्चिमेला आणि 4.5 अब्ज डॉलर्स पूर्वेकडे जातात. तज्ञ म्हणतात की जगातील वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हे चॅनेल अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच, हा मार्ग थांबला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.


सुवेझ कालव्याचा रस्ता व्यवसायासाठी बंद झाल्याची ही पहिली वेळ नाही. जून 1967 मध्ये इजिप्त, सिरिया आणि जॉर्डनची इस्त्रायलशी युद्ध सुरु होते त्यावेळी दोन गटांच्या गोळीबारात 15 व्यापारी जहाजे सुवेझ कालव्यात अडकली होती. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या लढाईचा 'सिक्स डे वॉर' असा उल्लेख आहे. इतिहास साक्षी आहे की हे युद्ध फक्त सहा दिवस चालले. त्यानंतर सुएझ कालव्याकडे जाणारा मार्ग बंद होता. कालव्यामध्ये अडकलेल्या 15 जहाजांपैकी एक जहाज बुडाले आणि उर्वरित 14 जहाजे पुढील आठ वर्षे तिथेच अडकून राहिली.