Sri Lanka Crisis : श्रीलंकेत नागरिकांनी सरकारविरोधात मोठे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनकर्त्यांनी देशाच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. सरकारमुळे ओढावलेल्या आर्थिक संकटाच्या विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रपती गोटाबाया यांचा लहान भाऊ बासिल राजपक्षे यांनाही याचा अनुभव आला. श्रीलंका सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बासिल यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनीच रोखले असल्याचे समोर आले आहे. 


राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ बासिल राजपक्षे हे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. बासिल हे देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. 


बासिल राजपक्षे 'रेशीम मार्गा'चा वापर करून श्रीलंकेबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, इमिग्रेसन कर्मचारी आणि युनियनने रात्रीच कामबंद आंदोलन केले. घोषणाबाजीनंतर  बासिल राजपक्षे यांना माघारी जावे लागले. 


बासिल राजपक्षे हे श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबीयांतील अनेकजण सरकारमध्ये सहभागी होते. अनेकांकडे महत्त्वाची खाती होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी राजपक्षे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रपती गोटाबाया हे देश सोडून गेले असल्याचे म्हटले जात आहे. तर, गोटाबाया अद्यापही देशात असल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला आहे. 


राष्ट्रपती गोटाबाया यांनी अजूनही औपचारिकपणे राजीनामा दिला नाही. सध्या ते अज्ञातवासात आहेत. काही दिवसांपूर्वीच हजारो आंदोलनकर्ते राष्ट्रपती भवनात घुसले होते. त्यानंतर गोटाबाया कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.