Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती (Sri Lanka Crisis) आणखी चिघळत चालली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( Sri Lanka President Gotabaya Rajapaksa)  यांनी देश सोडून मालदीवमध्ये आश्रय घेतला असल्याचे वृत्त आहे. गोटाबाया आता मालदीवहून (Maldives) सिंगापूरला जाण्याच्या तयारीत असून त्यासाठी एका खासगी विमानाची प्रतिक्षा करत असल्याचे वृत्त श्रीलंका डेली मिररने दिले आहे. 


डेली मिररला मालदीवमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांची पत्नी इओमा राजपक्षे हे आपल्या दोन सुरक्षा रक्षकांसह बुधवारी रात्री मालेहून सिंगापूरसाठी रवाना होण्याची शक्यता होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी या विमानात प्रवास करणे टाळले. त्यांनी मालदीव सरकारला एका खासगी जेट विमानाची मागणी केली आहे. मालदीवहून सिंगापूरला जाण्यासाठी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसाठी एका खासगी विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले जात आहे. त्याबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. 


श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. महागाईने उच्चांक गाठला असून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. श्रीलंकन जनतेने सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू केले असून राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाचा ताबा घेतला आहे. नागरिकांच्या रोषातून वाचण्यासाठी आणि संभाव्य अटक, कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रपती गोटाबाया यांनी देशातून बुधवारी पलायन केले असल्याचे वृत्त समोर आले होते. मागील काही दिवसांपासून राष्ट्रपती गोटाबाया हे अज्ञातवासात असल्याची माहिती आहे. देश सोडून पळून गेलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची आपल्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.


सरकारी वाहिनीवर ताबा 


आंदोलकांनी श्रीलंकेतील सरकारी वाहिनीवर मिळवत, भाषणे केली. त्यानंतर वाहिनीचे प्रसारण बंद करण्यात  आले. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. श्रीलंकेत 30 हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलीस, लष्कराला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.