South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात आज प्रवासी विमानाचा भीषण अपघात (South Korea Plane Crash) झाला. दक्षिण कोरियातील विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरुन विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत 179 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती योनहाप वृत्तसंस्थेने दिली आहे. सदर घटनेनं जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दक्षिण कोरियामध्ये 181 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. सदर घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.07 वाजता दक्षिण-पश्चिम कोस्ट विमानतळावर घडली. या घटनेत 179 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 175 प्रवाशांपैकी 173 कोरियन नागरिक आहेत. 2 थाई नागरिक आहेत. पक्ष्याला आदळल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरताना क्रॅश झाल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या मीडियाने केला आहे. दक्षिण कोरियातील मुआन येथे हा अपघात झाला. सदर अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापच्या वृत्तानुसार, पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाच्या लँडिंग गिअरवर परिणाम झाला असावा. त्यामुळे लँडिंग गिअर फुटल्याने आग लागली. योनहॅपच्या रिपोर्टनुसार, लँडिंग गियर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला पोहोचले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते विमानतळाच्या शेवटी असलेल्या कुंपणाला आदळले आणि विमानाला आग लागली. अपघातग्रस्त विमान जेजू एअरचे बोईंग 737-800 होते. जेजू एअरचे विमान, 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स घेऊन, थायलंडहून परतत असताना हा अपघात झाला. द गार्डियनच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई संग-मोक यांनी सांगितले की, बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यवाहक अध्यक्ष चोई संग-मोक देखील अपघातस्थळी पोहोचले आहेत.