सर्बिया : आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं आहे. कारण सर्बियातील पाक दूतावासनं केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. सर्बियातल्या पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मुलांना स्थानिक शाळेतून घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कारण मागील अनेक महिन्यांपासून महागाई आणि पाक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरता आली नाही. परिणामी शाळेनं मुलांना घरी पाठवल्यानं आता अधिकारी वर्ग संतापलाय. या अधिकाऱ्यांनी ट्विट करुन थेट पाक पंतप्रधान इम्रान खान यांनाच घेरलंय. अशा परिस्थितीतही अधिकारी वर्गानं आणखी किती काळ गप्प राहायचं? असा सवाल इम्रान खान यांना विचारणारं ट्विट खुद्द सर्बियातल्या पाक दूतावासानं केलंय.
ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महागाईनं सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अशात आपण इम्रान खान यांच्याकडून किती अपेक्षा करु शकतो. आपण सरकारी कर्मचारी आहोत. आणि मागील तीन महिन्यांपासून विना वेतन काम करत आहोत. आमच्याकडे मुलांची शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत. फी न भरल्यानं त्यांना शाळेतून काढून टाकलं आहे, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हे ट्वीट नंतर सर्बियातील पाक दूतावासाकडून डिलिट करण्यात आलं आहे.
पंतप्रधानांची देश चालवायला पैसा नसल्याची कबुली
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी देश चालवायला पैसा नसल्याची कबुली दिली होती. त्यामुळे सध्या पाकिस्तानला दुसऱ्या देशांकडे मदतीसाठी अबलंबून राहावं लागत आहे. पाकिस्तान सरकारच्या महसूल बोर्डाच्या पहिल्या ट्रॅक आणि ट्रेस यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात इम्रान खान यांनी जनसंबोधन केलं. यावेळी देश चालवण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसा पैसा नसल्याची कबुली इम्रान खान यांनी दिली होती. कर संकलनातील व्यत्यय आणि वाढतं परदेशी कर्ज हा सध्या पाकिस्तानचा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.
आर्थिक दिलासा मिळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेण्यासही तयार
पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे पाकिस्तानी जनतेपुढील संकटे आणखी वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नं पाकिस्तानसाठी सहा अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज देण्यास सहमती दर्शवली होती. या पॅकेजसाठी आवश्यक तरतुदी खर्च कमी करणे आणि कर वाढवणे पाकिस्ताननं मान्य केल्या आहेत. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे पुढील दोन महिन्यांत पाऊले उचलावी लागतील, असा खुलासाही यावेळी पाकिस्तान सरकारनं केला आहे.
संबंधित बातम्या
Pakistan Financial crisis : पाकिस्तानकडे देश चालवायला पैसा नाही, पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली